पुणे: १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली. याचे पडसाद संपूर्ण देशात पडले. विरोधकांनी ही दंगल सरकार आणि संघ पुरस्कृत असल्याचे आरोप वांरवार केला आहे. परंतु सरकारकडून आणि पोलिसांकडून ही दंगल घडविण्यात शहरी नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी काही लेखक, साहित्यिकांना अटक देखील केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान आता पुणे पोलीस या प्रकरणाच्या चौकशीसाठी अमेरिकेची मदत घेणार आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी वरवराराव यांच्या घरातून हार्ड डिस्क सापडली होती. ती हार्ड डिस्क खराब असून तिच्यातील डाटा परत मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेची मदत घेणार आहे. अमेरिकेतील फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ची मदत घेण्यासाठी पुणे पोलिस अमेरिकेला जाणार आहे. पोलिसांची टीम लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.