पुणे : कोरेगाव भीमा हिंसाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेर्नेन गोन्साल्विस यांना पुणे सत्र न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कोरेगाव भीमा हिंसाप्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही कार्यकर्त्यांच्या एसआयटी चौकशीला विरोध करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर अरुण फरेरा, वेर्नन गोन्साल्विस यांना शुक्रवारी पुणे शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी या दोघांनाही पुणे कोर्टासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरेरा आणि गोन्साल्विस हे बंदी असलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेत नवीन सदस्यांची भरती करून घेत असल्याची माहितीही पोलिसांनी आज न्यायालयात दिली.
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येऊ नये म्हणून इतिहासकार रोमिला थापर यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले.