नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी : भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणानंतर राज्यभरात उसळलेला उद्रेक गुरुवारी शांत झाला असला तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या संपूर्ण हिंसाचाराचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागविला असून, या अहवालात राज्य सरकारचे दोष दिसत असल्याची गोपनीय माहिती सूत्राने दिली आहे. तर हिंसाचारास कारणीभूत धरून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जोपर्यंत अटकेची कारवाई होत नाही, तोपर्यंत राज्यात शांतता अशक्य असल्याचा खणखणीत इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. भिडे व एकबोटे हे रा. स्व. संघाच्या जवळचे असल्याने त्यांना अटक करावी कशी? अशा धर्मसंकटात मुख्यमंत्री सापडले आहेत. दुसरीकडे, राज्यसभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या हिंसाचाराचा ठपका राज्यातील फडणवीस सरकारवरच ठेवला आहे. भीमा कोरेगावची परिस्थिती हाताळण्यात सरकार अयशस्वी ठरले, असा आरोप पवारांनी केला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हिंसाचाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्र्यांवरच कारवाईचे संकेत मिळत आहेत, अशी माहितीही भाजपच्या सूत्राने दिली आहे.
दलित तरुणांची धरपकड थांबवा : आंबेडकर
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करुन जनतेला विश्वास द्यावा, अशी मागणी आंबेडकर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आरोपींच्या अटकेशिवाय शांतता शक्य नसल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर राज्यात सरकारने सुरु केलेली दलित तरुणांची धरपकड थांबवावी, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आंबेडकर म्हणाले, बंद पुकारुन आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करुन सरकारने समाजाला विश्वास द्यावा. बंददरम्यान, हिंसाचार करणार्यांची क्लिप जर पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी, या यादीतील लोकांना आम्ही हजर करु; मात्र पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबावावे, त्याशिवाय आंदोलन नियंत्रणात राहणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केल्याने फडणवीसांच्या अडचणी वाढल्या आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे दोन्हीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्ती मानले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे दोघांवर कारवाई होणे अवघड आहे.
हिंसाचाराचा अहवाल केंद्राकडे!
भीमा कोरेगाव घटनेवर केंद्रातील गृहमंत्रालयाचे लक्ष्य होते. त्याबद्दल त्यांनी तातडीने अहवालही राज्य सरकारकडून मागविला आहे. हा अहवाल सरकारने केंद्राकडे पाठविला असल्याची माहिती केंद्राच्या प्रवक्त्याने दिली. हिंसाचारानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतत संपर्कात आहेत, असेही हा प्रवक्ता म्हणाला. राज्यभरात झालेले आंदोलन आणि तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासही केंद्राने राज्याला दिले आहे. दरम्यान, सूत्राच्या माहितीनुसार, या हिंसाचारास पोलिस खात्याची चूक निदर्शनास आली असून, त्याबद्दल केंद्राने राज्यावर दोष लावला आहे. तथापि, याबाबतची वाच्यता स्पष्टपणे होऊ शकली नाही. दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला राज्यात हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड केली होती. राज्यात ठिकठिकाणी रास्ता आणि रेलरोको केले होते. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, एका दिवसाच्या बंदमुळे राज्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बंदकाळात तोडफोड करणार्यांवर पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.
वढूतील घटनेकडे सरकारचे दुर्लक्ष भोवले!
भीमा-कोरेगाव प्रकरण हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अयशस्वी झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. गुरुवारी राज्यसभेत शून्य प्रहरात महाराष्ट्रात घडलेल्या घटनेवर चर्चा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उपसभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्य प्रहरात भीमा कोरेगाव दंगलीवर खेद व्यक्त करत, सर्व सदस्यांना आपले मत शांतपणे मांडण्याची विनंती करून चर्चेला सुरूवात केली. यामध्ये रजनी पाटील, शरद पवार, कणिमोझी यांसह अनेक खासदारांनी आपली मते मांडली. पवार म्हणाले की, 1 जानेवारीला महाराष्ट्रातील भीमा कोरेगावमध्ये जे झाले त्याच्यामुळे संपूर्ण देशाला ठेच पोहोचली आहे. मी स्वत: गेली पंचवीस वर्षे या विजय दिवसच्या कार्यक्रमाबद्दल ऐकत आहे; मात्र गेल्या 25 वर्षांमध्ये एकदाही अशी दुर्दैवी घटना घडल्याचे माझ्या पाहाण्यात नाही. विजय दिवसाच्या दिवशी भीमा कोरेगाव आणि आसपासच्या गावामध्ये ज्या गटना घडल्या अश्याचप्रकारचा प्रसंग काही दिवसआधी संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू या गावातही झाला होता. मात्र या घटनांकडे सरकारने लक्ष दिले नाही आणि त्यांचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, असा ठपकाही पवारांनी ठेवला आहे.