भीमा कोरेगाव येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार : रामदास आठवले

0

पुणे । जातीयवादातून होणारा अन्याय थांबविण्यासाठी, देशहितासाठी भीमा कोरेगाव येथे दोनशे वर्षांपूर्वी 500 महारांनी 28 हजार पेशव्यांचा खात्मा केला. त्या शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला आज दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. क्रांतिकारक विचारांची प्रेरणा देणार्‍या या विजयस्तंभाच्या परिसरात, भीमा कोरेगावात भव्य स्मारक उभारणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

भारतीय रिपब्लिकेशन पक्षाच्या (आठवले गट) वतीने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त आयोजित भव्य अभिवादन सभेत रामदास आठवले मार्गदर्शन करीत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यसभा खासदार अमर साबळे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, बाळासाहेब जानराव, सूर्यकांत वाघमारे, भूपेंद्र थुलकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

समाजाच्या उत्थानासाठी एकत्र येणे आवश्यक
पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला वंदनीय मानतात. त्यामुळे अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहू नये. हे सरकार आणि नरेंद्र मोदी मनुस्मृतीच्या नाहीतर, भीमस्मृतीच्या मार्गावर चालत आहेत. इंदू मिलच्या जागेवर स्मारक, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आदी गोष्टीतून हे सिद्ध होत आहे. त्यामुळे आंबेडकरवादी जनतेने गटातटाचे राजकारण सोडून एका छताखाली आले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास अध्यक्ष कोणीही व्हावे, मी त्यामध्ये जायला तयार आहे. परंतु, दलित समाजाच्या उत्थानासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

ब्राह्मण्यवाद टिकविण्याचा प्रयत्न
पेशव्यांनी देशासाठी कोणतीही लढाई लढली नाही. त्यांनी केवळ ब्राह्मण्यवाद टिकविण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यतेची लढाईचे प्रतीक असलेल्या या विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये प्रथम मानवंदना दिली आणि हा सोहळा सुरु झाला, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. एम. डी. शेवाळे, काकासाहेब कंबळकर, भूपेंद्र थुलकर, तानसेन ननावरे, परशुराम वाडेकर, राजाभाऊ सरोदे, शैलेंद्र चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.