भीमा कोरेगाव विजयस्तंभावरील अतिक्रमण अखेर निष्काशित

0

मुंबई : शौर्याचे प्रतिक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभावरील पन्नास वर्षांपासूनचे असलेले अतिक्रम अखेर न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून जनतेल्या न्याय दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही त्यांच्या हयातभर या विजयस्ंतभाला दरवर्षी एक जानेवारीला भेट द्यायचे. मात्र त्यांच्यानंतर या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. आज या स्मारकावरील अतिक्रमण दूर झाल्यामुळे मला अत्यानंद झाल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले म्हणाले. अतिक्रमणविरोधात पाठपुरावा करणार्‍या कार्यकर्त्यांनी आज बडोले यांचा मंत्रालयात सत्कार केल्यानंतर ते बोलत होते.

दोनशे वर्षांची परंपरा असलेले स्थळ खुले
या विजयस्तंभासह लगतची 10 एकर जागा हडपून स्वत:च्या नावावर करणार्‍या मावळदकर कुटुंबियांची मालकी पुण्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने अनधिकृत ठरवत संपुष्टात आणली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. दादासाहेब अभंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मला सहकार्य केल्यामुळेच 200 वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभावरील खाजगी मालकी रद्द झाली असून आता हे ऐतिहासिक स्थळ जनतेसाठी खुले झाले असल्याचेही बडोले म्हणाले.

विजयाची आठवण म्हणून जयस्तंभ
या विजयस्तभांची पार्श्वभूमी सांगाताना बडोले म्हणाले की, पुण्यातील दुसरे बाजीराव पेशवे आणि तत्कालीन ब्रिटीश सरकार यांच्यामध्ये 1818 मध्ये झालेल्या घनघोर युद्धात 500 महार सैनिक ब्रिटाशांच्या बाजूने लढले होते. या लढाईत बाजीराव पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याचा महार सैनिकांमुळे दारूण पराभव झाला. या विजयाची आठवण म्हणून ब्रिटीश सरकारने शूर महार बटालियनच्या स्मरणार्थ मौजे पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे, गट क्रमांक 1033 मध्ये जयस्तंभ उभारला होता. स्तंभाच्या देखरेखीसाठी खंडोजी माळवदकर यांची नेमणूक केली होती. त्याबदल्यात माळवदकर यांना मौजे पिंपरी सांडस वार्ड केसनंद व बकोरी या गावातील एकूण 260 एकर पन्नास गुंठे जमीन कसण्यासाठी दिली होती. ही जमीन वंशपरंपरेने मावळदकर यांच्या वंशजांकडे राहील वंशज नसेल तर ही जमीन पुन्हा सरकार दरबारी जमा होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र दोनशेसाठ एकर जमिन दिलेली असतानाही खंडोजी मावळदकर यांचे सध्याचे वंशज गुलाबराव बाबुराव मावळदकर, नामदेव व अशोक गुलाबराव मावळदकर तसेच सरस्वती गुलाबराव मावळदकर यांनी भिमाकोरेगाव विजयस्तंभ व लगतची 10 एकर जागा 1965-66 च्या दरम्यान स्वतःच्या नावावर करून या ऐतिहासिक स्तंभावर स्वतःची खाजगी मालकी दाखवली होती. भिमाकोरेगाव संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग व विश्‍वस्त ज्येष्ठ समाजसेवक सुदामराव पवार यांच्यासह विविध संस्था संघटनांनी या प्रश्नावर अनेकदा आंदोलने केली. शासनाकडे पाठपुराव केला मात्र मावळदकर याला दाद देत नव्हते, असेही बडोले म्हणाले.

सर्व फेरफार नोंदी रद्द करण्याचे आदेश
याआधी दादासाहेब अभंग यांनी या विषयावर 2015 मध्ये मंत्रालयात भेटून या विषयाची माहिती दिली आणि घटनेचे गांभीर्य कथन केले होते. त्यानंतर लगेच भिमाकोरेगाव स्मारकास ताताडीने भेट देण्यात आली. सर्व सबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक घेवून गांभीर्याने हा विषय हाताळण्याच्या सूचना केल्या. हल्लीच पुणे हवेली उपविभागाच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे सुनावणी पार पडली. या सुनावणीअंती मावळदकर यांची खाजगी मालकी अनधिकृत असल्याचा निर्णय देतानाच सर्व फेरफार नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले असल्याचेही बडोले यावेळी म्हणाले.