भीमा कोरेगाव विजय रणस्तंभाचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न

0

पुणे । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव विजय रणस्तंभाची शौर्यगाथा समाजापुढे आणली. भीमा कोरेगाव विजय रणस्तंभाचा इतिहास कायमच दडपण्याचा प्रयत्न झाला असून त्यामुळे विजय रणस्तंभाच्या परिसराचा विकास होऊ शकला नाही, असे मत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.

विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमणे हटविल्याबद्दल वाघोली येथे भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघातर्फे **** नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी बडोले बोलत होते. माजी न्यायाधीश सी. एस. थूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) चे महासंचालक राजेश ढाबरे, आमदार मिलिंद माने, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, राजेंद्र गायकवाड, सचिन कडलक, विशाल सोनवणे, डॉ. प्रशांत पगारे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी हंबीरराव कांबळे याप्रसंगी उपस्थित होते.

रणस्तंभ परिसरात विकासकामे
कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ परिसरात लवकरच शासनाच्या वतीने विकासकामे सुरू करण्यात येतील. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिलिटरी फाऊंडेशनची स्थापना शासनातर्फे करण्यात येईल. डॉ. आंबेडकर स्वत:साठी कधीच जगले नाही. त्यांचा विचार हा राजकारणाच्याही पुढचा विचार होता. ज्याप्रमाणे बुद्धांचा विचार हा धर्माच्याही पुढचा विचार होता, असे बडोले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

विजयस्तंभ शूरवीरांच्या विजयाचे प्रतीक
भिमा कोरेगावची शौर्यगाथा ही विषमतावादी विचारांच्या विरोधातील लढाई होती. त्यामुळे भिमा कोरेगावचा गौरवशाली इतिहास शासनातर्फे पुस्तक स्वरुपात विद्यार्थ्यांसाठी पुढे आणणे गरजेचे आहे. भिमा कोरेगावचा विजयस्तंभ शूर वीरांच्या विजयाचे प्रतीक आहे, असे बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले.