अभिवादन रॅली व आरक्षण परिषदेला उस्फुर्त प्रतिसाद
मान्यवरांच्या हस्ते ईव्हीएम मशीनचे दहन
बहुजनांनो संघटित होऊन लढा; मान्यवरांचा सुर
चाळीसगाव – येथील बहुजन क्रांती मोर्चा, बंजारा क्रांती दल तसेच रयत सेनेच्यावतीने शहरात अभिवादन रॅली व आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाची प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही रॅली रेल्वस्थानकापासून काढण्यात येवून तिची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनचे दहन केल्याने खळबळ उडाली होती
सर्व संघटनांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम
आरक्षण परिषदेचे उद्घाटन बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी केले. भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा ,बंजारा क्रांती दल, रयत सेना, भारतीय बंजारा क्रांती दल, भारतीय बौद्ध महासभा, देशभक्त पार्टी, शिक्षक परिषद, शिक्षक संघटना, लहुजी सेना, चर्मकार उठाव संघ, क्षत्रिय समाज, भारतीय सेवा संघ, लोकजनशक्ती पार्टी, आदिवासी महासंघ, राष्ट्रीय बंजारा टायगर, राष्ट्रीय समाज पक्ष, जय मल्हार सेना, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, परीट सेवा मंडळ व शेतकरी कामगार पक्ष या संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश नेतकर, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, बामसेफचे मिलिंद भालेराव, विचारवंत गौतम निकम, दलीत हक्क समितीचे धर्मभुषण बागुल, यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. बेलगंगा संचालक रवींद्र पाटील, बाबू मुल्ला, रामदास जाधव, शेतकरी कृती समितीचे ड. भरत चव्हाण, ओंकार आबा जाधव, भारिपचे संभा जाधव ,भिमराव जाधव, ईश्वर राठोड यांचे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत ठाकरे यांनी तर आभार आर.एन.सोनवणे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून निखिल महाले यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
ईव्हीएम मशीनचे दहन
यावेळी उद्घाटक राकेश जाधव यांनी परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की, अगड पगड बारा बलुतेदार जाती सह सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. राज्यात व देशात सध्या संविधान विरोधी वातावरण पसरले आहे. बहुजन समाजातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. आपल्याच तालुक्यातलं उदाहरण द्यायचे झाले तर सोलर पीडित शेतकर्यांवर मोठा अन्याय होत असताना लोक प्रतिनिधी शांत बसले आहेत. शेतकरी भूमिहीन झाले आहेत त्यांची अवस्था ना घर का ना घाट का झाल्याने त्यांच्या मागे खंबीर भूमिका घेण्यासाठी आपली एकतेची वज्रमूठ बांधूया असे बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव यांनी केले याप्रसंगी ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आल्याने खळबळ उडाली घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.