भीमा-कोरेगाव हिंसाचार:एल्गार परिषदेतील भाषणे जबाबदार-पुणे पोलीस

0

पुणे- एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे उपस्थितांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला, असे या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे. कोरेगाव-भिमा हिंसाचारावर कोणत्याही शासकीय संस्थेकडून पहिल्यांदाच एल्गार परिषदेवर हिंसाचाराचा थेट ठपका ठेवण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पुणे शहर पोलिसांच्यावतीने चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. सेनगावकर यांच्या हद्दीत एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रात एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणे, त्या भाषणांविरोधात दाखल झालेले एफआयआरची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

भीमा-कोरेगावच्या लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन अभियानातर्फे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 1 जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास करण्यासाठी चौकशी आयोग गठीत करण्यात आला असून यामध्ये दोघांचा समावेश आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे एन पटेल आणि माजी राज्य सचिव सुमित मुलिक यांचा चौकशी आयोगात समावेश आहे.

यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगाला आपण कोणत्याही एखाद्या विशिष्ट संस्थेवर आरोप करण्याचा परिस्थितीत नाही अशी माहिती दिली होती. मात्र, राज्य सरकारने कोरेगाव भीमामध्ये योग्य ती सुरक्षेची व्यवस्था केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.