भीमा-कोरेगाव हिंसाचार: तीन जणांचा जमीन अर्ज फेटाळला

0

पुणे- भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारापूर्वी पुण्यात घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून २८ ऑगस्टला देशभरातून ५ जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्णन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज पुणे कोर्टाने आज फेटाळला. हे तिघेही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या नजरकैदेत असून आज ही नजरकैद संपणार असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे ७ दिवसांसाठी आपली नजरकैद वाढवण्यात यावी यासाठी या तिघांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

त्यांनी या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर कोर्टाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आादेश दिले होते. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने या तिघांसह वरवरा राव आणि गौतम नवलाखा यांच्या सुटकेचा अर्ज फेटाळून लावला होता. उलट त्यांच्या नजरकैदेत ४ आठवड्यांनी वाढ केली होती.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, गौतम नवलखा आणि वरवरा राव या पाच जणांना अटक झाली होती. मात्र, यांपैकी नवलखा यांच्यावरील नजरकैद दिल्ली उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी उठवली होती. तर राव यांनी पोलिसांच्या कारवाईला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे या दोघांच्याही जामिनावर पुण्यात निर्णय होणार नाही.