भीमा-कोरेगाव हिंसाचार: धागेदोरे दिग्विजय सिंह यांच्या पर्यंत;चौकशीची शक्यता

0

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा प्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याशीही धागेदोरे असल्याचे दिसत आहेत. माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा व त्यांना मदत करण्याबाबतच्या जप्त केलेल्या पत्रातील उल्लेखामुळे दिग्विजय सिंह यांची पुणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशमध्ये निवडणुका सुरु असून दिग्विजय सिंह यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन जूनमध्ये नागपुरातील अ‍ॅड सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांना अटक करुन त्यांच्याकडील लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त केले होते. त्यात कॉम्रेड प्रकाश यांनी अ‍ॅड. गडलिंग यांना लिहिलेले २५ सप्टेंबर २०१७ रोजीचे एक पत्र पुणे पोलिसांना मिळाले होते. त्यात कॉम्रेड प्रकाश यांनी आपल्या आंदोलनाला काँग्रेस नेते मदत करायला तयार आहेत. त्यासाठी लागणारा निधीही त्यांच्याकडून मिळू शकतो. त्या संबंधात तुम्ही आपल्या काँग्रेस मित्रांशी संपर्क साधावा असे म्हणून त्यात एक मोबाइल क्रमांक दिला होता. हा मोबाइल क्रमांक दिग्विजय सिंह यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे दिग्विजय सिंह यांच्याकडे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, रोना विल्सन आणि दीपक राऊत यांना अटक केली होती. वरवरा राव यांना शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी दिली आहे़ या पोलीस कोठडीच्या काळात त्यांच्याकडे चौकशी करुन अधिकाधिक पुरावा गोळा करुन तो २६ नोव्हेंबरला न्यायालयाला सादर करायचा व अधिक तपासासाठी आणखी पोलीस कोठडी मिळवायची याकडे पुणे पोलिसांने प्राधान्य असणार आहे. तसेच आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला उत्तर देण्यासाठी पुणे पोलीस त्यासंबंधीचा पुरावा एकत्र करुन तो न्यायालयात सादर करण्याला प्राथमिकता देत आहे. त्यामुळे अशी काही चौकशी करण्याचे अद्याप तरी प्रायोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.