भीमा नदी पात्रात वाळू माफियांकडून वाळू उपसा खुलेआम सुरूच

0

दौंड । दौंड तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर असणार्‍या पारगाव, नानगाव, हातवळण, कडेठाण, कानगाव परिसरात कायदा धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. सक्शन पंपाद्वारे वाळू उपशाला बंदी असताना तालुक्यातील वाळू माफियांकडून खुलेआम उपसा केला जात आहे. गुप्तपणे वाळू माफियांची माहिती पुरवणार्‍या व्यक्तीचे नाव वाळू माफियांना समजत असल्याने नागरिकही विचारात पडले आहेत. महसूल आणि माफीयांची वाळू उपसा करणार्‍या माफियांचे गॉडफादर दहशत निर्माण करत आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन यंत्रणेकडून थातूर-मातूर कारवाई करून दिखावा केला जात आहे. वाळू माफियांची संपूर्ण माहिती महसूल यंत्रणेने गोळा करून त्यांच्यावर मोक्कासारख्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

व्हॉट्सपवर महसूल अधिकार्‍यांचे लोकेशन
दौंड तालुक्यात वाळू माफियांनी वाळू उपशासाठी मोठी यंत्रणाच उभी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सपवर विविध ग्रुप तयार केले असून, या ग्रुपवर दिवस रात्र भीमा नदी व त्या शेजारी असणार्‍या ओढ्यामधून वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांना महसूल अधिकार्‍यांचे लोकेशन, पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांबाबत माहिती टाकली जाते.

माफियांची हाती घातक शस्त्र
कडेठाण, हाथवळण, नानगाव, कानगाव, पारगाव तसेच दुसर्‍या तीरावर असणार्‍या नागरगाव, वडगाव, रांजणगाव, मांडवगण या परिसरातील वाळू माफियांचा सक्रीय आहेत. हे माफिया वेळ प्रसंगी नंग्या तलवारी घेऊन नदी आणि ओढ्या काठी जागता पहारा देत उभे असतात. त्यामुळे या ठिकाणावरून जाणार्‍या नागरिकांच्या मनामध्ये कमालीची दहशत निर्माण झालेली पाहायला मिळते. संबंधित ठिकाणची माहिती जर नागरिकांनी धाडस करून दिली तर काही दिवस वाळू उपसा बंद होतो. मात्र, सरकारी अधिकार्‍यांची पाठ फिरली की पुन्हा वाळू उपसा दुप्पट वेगाने सुरू होतो.