भीम अ‍ॅप विषयी सांगा, दहा रुपये कमवा

0

नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अ‍ॅप रेफरल योजनेची नागपुरात घोषणा केली. या योजनेअंतर्गत ज्यांच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहक भीम अ‍ॅप डाऊनलोड करतील त्या संबंधिताच्या बँक खात्यात दहा रुपये जमा होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 14 ऑक्टोबर 2017 पर्यंत भीम अ‍ॅप रेफरल योजना सुरु राहणार आहे. अशाप्रकारे रोज 20 जणांना भीम अ‍ॅपचे महत्त्व समजावून डाऊनलोड करायला लावल्यास दिवसअखेर दोनशे रुपयांची प्राप्ती तुम्हाला होईल, असेही मोदी म्हणाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये आले. सकाळी दीक्षाभूमीवर जाऊन त्यांनी डॉ. आंबेडकर यांना वंदन केले. त्यानंतर, उपराजधानीतील आयआयएम, आयआयटी आणि एम्स या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमीपूजन केले. तसेच कोराडी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील 2 नवीन पॉवर स्टेशनचे उद्घाटनही केले.

युवकांना डिजीटल पेमेंटकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना आणल्याचे मोदी यांनी सांगितले. समर व्हेकेशनमध्ये जॉब करण्याऐवजी अशाप्रकारे महिन्याअखेर हजारो रुपये कमवण्याची संधी असल्याचेही मोदींनी सांगितले. भीम अ‍ॅप हा अर्थव्यवस्थेतला महारथी असून त्याचे वापरकर्ते भ्रष्टाचारविरोधी शिलेदार असल्याचे मोदी म्हणाले.

पाच वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली नाही, पण देशासाठी जगण्याची संधी तरी मिळाली, म्हणून पुढील पाच वर्षात प्रत्येक तरुणाने देशाचा विकास करण्याचे उद्दिष्ट बाळगावं, त्या काळी फास कमी पडले, पण भारतमातेसाठी बलिदान देणार्‍यांची देशाला कधी कमतरता पडली नाही, असेही मोदी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य गरीबांसाठी कायम प्रेरणादायी ठरले. त्यांच्या जयंतीनिमित्ताने दीक्षाभूमीवर येण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. बाबासाहेबांना जीवनात क्षणोक्षणी विष मिळाले, पण त्यांनी अमृताचा वर्षाव केला, अशा शब्दात पंतप्रधानांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

डिजिटल व्यवहार करण्यांना लाखो रुपयांची बक्षीसे
नोटाबंदीनंतर सरकारने देशात डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरु केल्या होत्या. त्यातील बक्षीसपत्र ठरलेल्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. त्यात लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे या तरुणीला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. श्रद्धाने केवळ 1590 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. डिजीधन योजनेअंतर्गत ती भाग्यवान ठरली. तर चिमन भाई प्रजापती (गुजरात यांना 50 लाखाचे दुसरे आणि केवळ शंभर रुपयांचे डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह (देहरादून) यांना 25 लाख रुपयांचे तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

अशाच प्रकारे ग्राहकांसह व्यापार्‍यांसाठीही बक्षीसे देण्यात आली. त्यात चेन्नईच्या जी.आर. राधाकृष्णन यांना 50 लाखाचे पहिले, ठाण्याच्या रागिनी उत्तेकर यांना 25 लाखाचे दुसरे आणि हैदराबादच्या शेख रफी यांना 12 लाखाचें तिसरे बक्षीस देण्यात आले.