मुंबई : भीम आर्मीच्या मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यात ३०० ते ४०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या सभा मुंबई, महाराष्ट्रात होऊ नयेत यासाठीच हे अटकसत्र सुरू असल्याचा आरोप आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
भीम आर्मीचे नेते आझाद यांची आज वरळीतील जांबोरी मैदानात सभा होणार आहे. या सभेसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, कालपासून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी मालाड येथील मनाली हॉटेलात नजरकैदेत ठेवलं आहे. त्यांना सभा घेण्याची परवानगीही नाकारली आहे. दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी येथील पोलिसांनी त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
माकपकडून सरकारचा निषेध
माकपनं सरकारच्या या दडपशाहीचा जोरदार निषेध केला असून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. भीम आर्मीच्या सभेला परवानगी देण्यात यावी. तसंच, कोरेगाव-भीमा दंगलीतील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही माकपच्या वतीनं करण्यात आली आहे.