भिवंडी । मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीतील माणकोलीजवळ मंगळवारी सकाळी भरधाव कार आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मुंबईच्या जे.जे.रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूने येणार्या वाहनांची प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती.
मंगळवारी सकाळी 10 चे सुमारास हायवे दिवा गावालगत भिवंडी बाजूकडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.04 ए.एल.2742 या कारचा टायर फुटल्याने कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्तादुभाजकावरून विरूद्ध दिशेने येणार्या ठाणे अलिमघर या टी.एम.टी.बस क्रमांक एम.एच.04 जी 8002 यावर धडकल्याने कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
यातील दोघा जखमींना उपचारासाठी मुंबईच्या तर तिसर्या जखमींना डोंबिवली येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. भीषण अपघाताची माहिती मिळताच भिवंडी परिमंडळाचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याबाबत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. अपघाताच्या घटनेचा सखोल तपास पोलीस यंत्रणेकडून केला जाणार असुन अपघाती गुन्ह्याची नारपोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
मृतांची नावे
1) विक्रांत अरुणकुमार सिंग (वय-24, सी/410, आंध्रा बँकेजवळ, रोड नं. 4, डोंबिवली)
2) नीरज कमलेश पांचाळ (वय-23, ए/601, महावीर दर्शन, गोकुळ कॉलेज, मिरारोड)
3) मिहीर अनिल उतेकर (वय-23, कपिल सोसायटी, दुसरा मजला, शांतीनगर मिरारोड)
4) निरव कृष्णकांत मेहता (वय-23, मेघमिलाप वाटीका, रो हाऊस नं. 193, सुभाष गार्डन, जहांगीरपुरा, सूरत, गुजरात)
जखमींची नावे
1) वैभव महेंद्र छेडा (वय-24, जे.जे. रुग्णालय)
2) रमेश शामजी पटेल (वय-22, जे.जे. रुग्णालय)
3) संतोष मिश्रा (वय-24, समता रुग्णालय, डोंबिवली)