पुणे । पुणे-सोलापूर महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण या अपघातात जखमी झाले आहेत. महामार्गावरील उरुळी कांचन येथे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून टँकरने जोरदार धडक दिली.
यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली. या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (वय- 14, रा. दहामोनी ता . सोनपेठ जिल्हा. परभणी ) आणि टँकर चालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (वय 37, रा. दहामोनी ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (वय 36, रा. चांदापूर ता. परळी बीड ), राजू विश्वनाथ पंडीत (वय – 35 रा. दहामोनी ), कांताबाई मरीबा उजगर (वय -45 रा. मांडवा परभणी ), इंदु राजु पंडित (वय 33, दहामोनी ) तसेच ट्रक चालक शैहफान दशरथ शेख (वय 23, इंदापूर ) हा गंभीर जखमी झाला आहे.