अयोध्यानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; ठेकेदाराच्या घरीही डल्ला मारुन ऐवज लांबविला
जळगाव- अयोध्यानगरातील भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप रामकृष्ण रोटे यांच्या घरुन पाच हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवारी समोर आली आहे. दरम्यान मध्यरात्री याच परिसरातील अशोक नगरातील कंपनीत मजुर पुरविणारे ठेकेदार अशोक पुलचंद जैस्वाल यांच्या बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम दागिणे असा तीन लाखांचाही एैवज लांबविला.
अयोध्यानगरातील श्रीरामपार्क जवळ भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामकृष्ण रोटे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. मुलगा व मुलगी दोन्ही पुण्याला शिकायला असून घरी पती व पत्नी असे दोघे राहतात. महिनाभरापासून पुण्याहून मुलगी घरी आली आहे. सोमवारी ती पुण्याला जाणार आहे. दुमजली घर असून खालच्या घरात कपाट, साहित्य ठेवले आहे. साहित्य ठेवण्यासह जेवणासाठी या खोलीचा वापर होतो. रात्री वरच्या खोलीचा झोपण्यासाठी वापर होतो.
वरती झोपले कुटूंब अन् खालच्या घरात चोरी
नेहमीप्रमाणे सर्व जण जेवण झाले. रात्री वादळ असल्याने लाईट बंद होती. 11 वाजेपर्यंत सर्व जण जागी होते. यानंतर खालच्या खोलीला कुलूप लावून कूटूंब झोपले. सकाळी उठल्यावर रोटे यांच्या पत्नी साधना या खाली आल्यावर त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. यानंतर घरात पाहणी केल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. चोरट्यांनी
दोन दिवसांपासून दुचाकीवरुन रेकी
रोटे यांच्या शेजारचे ब्राम्हण तिवारी तसेच वाणी यांच्या माहितीनुसार एक जण दुचाकीवरुन रोज ये-जा करत होता. रेकीदरम्यान मंडळ अध्यक्ष असल्याने रोटे यांच्या घरी 13 रोजी निवडणुकीच्या प्रचारार्थ मोदींचे मास्क व टी-शर्ट असे साहित्य आले. रेकी करणार्याला वाटले निवडणुकीत वाटपासाठी पैसा आला. मोठा माल हाती लागेल म्हणून चोरट्यांनी रात्री रोटेंचे घराचे कुलूप तोडले. खोके तपासले असता त्यात निवडणुकीचे साहित्य दिसले. ते तसेच सोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून 5 हजार रुपये लांबविले. देवघरातील चांदीचा ग्लास देव सुरक्षित असल्याचेही रोटे यांनी सांगितले.
कुत्र्यांचा जीव घेवून नंतर चोरी
घरात घुसण्यापूर्वी चोरट्यांना बघून गल्लीत कुत्रे भुंकत होते. चोरट्यांनी त्याला जीवानिशी मारुन टाकले. यानंतर घरात घुसून रक्कम लांबविली. सकाळी उठल्यावर उभ्या चारचाकीवर रक्ताचे डाग दिसल्याने कुत्र्याला मारल्याचा प्रकार समोर आला. यानंतर रोटे यांच्या घरी आलेल्या नगरसेवकांनी महापालिकेचे गाडी बोलावून मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावली.
सुदैवाने मित्रांचे सव्वा लाख रुपये वाचले
प्रदीप रोटे हे मूळचे नशिराबाद येथील रहिवासी आहेत. 25 वर्षापासून ते अयोध्यानगरात वास्तव्यास आहेत. नशिराबाद येथे शेती तर जळगावात पक्षाचे काम करतात. नशिराबाद येथील जवळच्या मित्राने रोटे यांना सव्वा लाख रुपयांची रक्कम ठेवण्यासाठी दिली होती. रोटे यांनी ती घरी कपाटात सुरक्षीत ठेवली होती. रविवारी सकाळीच त्यांनी मित्राला ती रक्कम पुन्हा परत केली. त्यामुळे ती रक्कम वाचली. परत केली नसती, कपाटातील ही रक्कम चोरी होवून मोठे नुकसान झाले असते, असेही रोटे यांनी बोलतांना सांगितले
ठेकेदाराच्या बंद घरुन 74 हजारांचे दागिणे लांबविले
अयोध्यानगर परिसरातीलच अशोक नगरात कंपनीत मजुर पुरविणारे ठेकेदार अशोक पुलचंद जैस्वाल यांचेही बंद घर फोडले. लाकडी दरवाजाचे कोयंडा कापून घरात प्रवेश केला तसेच देवघरातील कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 ग्रॅमची 26 हजाराची सोन्याची चैन, 15 ग्रॅमची 19 हजार 500 रुपयांची सोन्याची चैन, 10 ग्रॅम 13 हजाराची अंगठी, 7 ग्रॅमच्या 9 हजार 100 रुपयांच्या दोन अंगठ्या, 5 ग्रॅमची 6500 रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण 74 हजार 100 रुपयांचे दागिणे लांबविले
खंडव्याला मध्यरात्रीचे गेले कुटूंब अन् चोरी
अशोक जैस्वाल यांना त्यांचे खंडवा येथील मुंदी गावचे काका रमेश वालचंद जैस्वाल हे वारल्याची फोनवरुन खबर मिळाली. त्यानुसार पत्नी ज्योती व मुलगा दिनेशसह रोटे हे रविवारी मध्यरात्री 11.30 वाजता रेल्वेने खंडव्याकडे जाण्यासाठी निघाले. मध्यरात्रीच चोरट्यांनी हात दाखविला. अवघ्या पाच तासात चोरट्यांनी दागिणे लांबविले.
मुलगा अर्ध्याप्रवासातून घरी परतला
जैस्वाल हे रोज घरासमोरील पुरूषोत्तम चव्हाण यांच्यासोबत मॉर्निग वॉकला जातात. जैस्वाल गावाले गेले याबाबत चव्हाण यांना माहिती होती. चव्हाण नेहमीप्रमाणे 5.30 वाजता सकाळी उठले असता त्याना जैस्वाल यांचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तत्काळ याबाबत जैस्वाल यांना फोनवरुन माहिती दिली. तोपर्यत कुटूंब खंडव्याला पोहचले होते. याठिकाणी अशोक व त्यांची पत्नी पुढे रवाना झाले तर त्यांचा मुलगा दिनेश हा पुन्हा परतला. सकाळी 9 वाजता जळगावात पोहचल्यावर त्याने घराची पाहणी केली. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दिली