भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ

0

ईडीकडून 20 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरूंगात असलेल्या असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये पुन्हगा एकदा वाढ झाली आहे. संक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी भुजबळ यांची 20.41 कोटींची मालमत्ता जप्त केली असून, त्यांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा आता 178 कोटींवर पोहोचला आहे.

जामिनासाठी भुजबळांचा अर्ज
मंगळवारी सक्तवसूली संचलनालयाकडून छगन भुजबळ यांच्या 20.41 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. भुजबळ सध्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच याप्रकरणी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांनादेखील तुरूंगाची हवा खावी लागली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, या आठवड्यात त्यांच्या जामीनअर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणी नंतर त्यांना जामीन मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या कारवाईमुळे भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. येत्या 7 डिसेंबररोजी विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान करण्यात येणार असून, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भुजबळ इच्छुक असल्याच्याही चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

कोर्टात शिवसेना आमदाराची उपस्थिती
छगन भुजबळांच्या जामीन अर्जाला पीएमएलए कोर्टात ईडीच्यावतीने जोरदार विरोध व्यक्त करण्यात आला. पीएमएल कायद्यातील कलम 45 च्या सुधारणेतील तरतुदीनुसार भुजबळांचा नवा जामीन अर्ज हा असंविधानिक असल्याचा आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावर यांनी केला. भुजबळ यांच्यावरील सुनावणीसाठी त्यांच्या कुटुंबातील अनेकजण हजर होते. विशेष म्हणजे, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हेसुद्धा सुनावणीवेळी उपस्थित होते. सुर्वे हे बराच वेळ छगन भुजबळांच्या अगदी शेजारी बसून होते. सुर्वे हे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी ते छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. भुजबळांचे कट्टर समर्थक अशीही प्रकाश सुर्वेंची ओळख होती. मात्र विधानसभेवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडूनही आले.