भुजबळांच्या मनात चाललंय तरी काय?

0
देशात आणि राज्यात घोटाळेबाज आणि भ्रष्ट राजकारण्यांची कमी नाहीच. चांगले राजकीय पुढारी आपल्याला आता शोधावे लागतात. मग आपण आपल्या नेहमीच्या भारतीय मानसिकतेनुसार जो तुलनेत कमी भ्रष्ट्राचारी आहे त्याला चांगले म्हणवून घेतो. अनेक राजकीय नेते सूडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे आजही जेलची हवा खात आहेत. अनेकजण जामिनावर सुटलेत तर अनेकांना निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट देखील मिळाले असून ते उजळ माथ्याने आपला राजकीय प्रवास करीत आहेत. महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांसोबत नजीकच्या काळात असाच ’अन्याय’ झाला असल्याच्या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. सत्ता ही ’ज्याच्या हाती ससा, तोच पारधी!’, ’गरज सरो, वैद्य मरो’ अशा म्हणींच्या तत्वावरच चालते. निष्ठा बिष्ठा अंधश्रद्धाच. तुम्ही सत्तेला बोचू लागले की तुमचा राजकीय गेम झालाच म्हणून समजा. आणि मग सत्तेला गरज वाटली तर ऐनकेन प्रकारे तुमची एन्ट्री देखील अगदी सुखरूपपणे आणि वाजत गाजत केली जाते. आतमध्ये असल्यावर तुमच्या समर्थनार्थ एकही ब्र शब्द न काढणारे मग तुमच्या कौतुकाची पारायणे घालायला लागतात आणि घालवलेल राजकीय वजन अवघ्या काही दिवसात परत येते.
नाथाभाऊ यांच्यावर आरोप झाले. त्यांनी स्वयंस्फुर्तीने मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि मग जो काही त्यांच्या मागे आरोपांचा आणि चौकशांचा ससेमिरा लागला. अंतर्गत काड्या करणार्‍यांच्या विषयी अनेकदा जाहीरपणे बोलून त्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. ’कागद दाखवा, राजकारण सोडतो’, कर नाही त्याला डर कशाला असे म्हणत बिनधास्त राहण्याचा हा त्यांचा फंडा शेवटी विजयी झाला. अर्थात या काळात त्यांनी जे काही भोगल हे निश्चितच खडतर. ज्या संघटनेला आपण मोठे करुन सत्तेवर बसवलं त्या सत्तेचा उपयोग करता येत नसल्याची खंत त्यांच्या मनाला खायची. सोशल माध्यम असो किंवा चक्क विरोधकांकडून असो त्यांच्यावरील अन्यायाबाबत सतत बोलले जाऊ लागले. सोशल मिडीयात भाजपची प्रतिमा डाऊन होऊ लागली. मुख्यमंत्री वगळता एकही जन या प्रतिमेला वर आणण्यासाठी समर्थ नसल्याची जाणीव होताच भाजपचे खर्‍या अर्थाने राज्यातले मोठे नेते नाथाभाऊ यांना क्लीनचीट मिळाली. गरज पडली आणि त्यांना इन करावे लागले. कदाचित लवकरच ते मंत्रीपदी विराजमान होतील अशी शक्यता देखील निर्माण झाली आहे.
असो, नाथाभाऊंच्या समांतर किंवा त्यांच्या काही काळ आधी छगन भुजबळांचा राजकीय गेम झाला. अतिशय गरीब कुटुंबातून आलेला हा नेता.  मुंबई महापालिकेवर नगरसेवक, महापौर, आमदार ते राज्याचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास रंजकदार.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.  जेव्हा गिरणगावात केवळ शिवसेनेचा आवाज घुमायचा आणि शिवसेनाप्रमुखांचा शब्द अंतिम असायचा अशा काळात छगन भुजबळांनी बंड पुकारले. पक्षात बंडाळी केल्याने शिवसैनिक संतापले आणि त्यांनी छगन भुजबळांवर हल्ला देखिल केला होता.  भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. भुजबळ हे राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. भुजबळ हे माळी समाजाचे ओबीसी नेते. त्या काळात ‘समता परिषदेचे’ काम सुरू झाले आणि येवला, निफाड, लासलगाव आदी भागांतून मोठे कार्यकर्ते पुढे आले, त्यातून विधानसभेसाठी ‘येवला’ हा मतदारसंघ निवडला आणि त्यांनी आपले कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा केले.
छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत’ असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. हेच दिलीप कांबळे म्हणतात, छगन भुजबळ राष्ट्रवादी सोबत राहणार नाहीत!. ज्या प्रकारची वागणूक राष्ट्रवादीने त्यांना दिली आहे, ती पाहता ते राष्ट्रवादीत राहणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. चौकशीच्या फाईलवर त्यांच्याच सरकारच्या काळात सह्या झाल्या असल्याने कांबळे यांच्या या दाव्यात काहीसे तथ्य आढळते असे म्हणावे लागेल. राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा जो नाशिकमध्ये होणार होता. त्याच्या समारोपाला खुद्द शरद पवार येणार होते. ही नाशिकची सभा भुजबळांचे कार्यकर्ते उधळणार होते. ही गोष्ट पवारांना कळल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहानुभूतीपूर्वक पत्र लिहिले असल्याचे देखील कांबळे म्हणतात. भुजबळांना योग्य वैद्यकीर उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदार ही सरकारची असेल, असा इशारा शरद पवारांनी या पत्रात दिला होता.
भुजबळ जामिनावर बाहेर आले आणि राष्ट्रवादी सह अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचारपूस आणि टीवटीवाट केला. यात विशेष नोंद घेण्याजोगे ठरले ते भुजबळ यांची शिवसेनेशी जवळीकता. भुजबळ यांच्या समर्थनार्थ ’सामना’ दैनिकात अग्रलेख आला. मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली दोन वर्षे कारागृहात असताना भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. पक्षाने आपल्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न केला नसल्याची खंत भुजबळांची आहे. दरम्यान, भुजबळांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे यांनी भुजबळांनी प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचविले होते. यानंतर नुकतेच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची लिलावती रुग्णालयात भेट घेऊन राजकीय चर्चा केली.  हे सगळे घडत असतानाच नाशिकमध्ये शिवसेनेने विधानपरिषद मारली. विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. या विजयात छगन भुजबळांनीही हातभार लावला, अशी सूचक प्रतिक्रिया खुद्द शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. या सगळ्या घडामोडींच्या मुळे दराडे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी सोडून जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. निरंजन डावखरे यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळत भाजप प्रवेश केला. इतके वर्ष पक्षात राहून, पदे उपभोगताना राजकारण होत नव्हते का?, त्यांना जनाधार नव्हता असे सांगत राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर ऑफिशियल टीका केली तर सोशल मिडीयात त्यांच्यावर टीकेचा महापूर होत आहे. मात्र इतके वर्ष पक्षाला देखील त्यांना जनाधार नाही हे कसं कळल नाही? हा देखील प्रश्न आहे. आणि सत्ताधारी पक्षाला त्यांना जनाधार आहे हे देखील समजतय.  बाकी पक्षात आहेत तोवर तोंडभरून कोडकौतुक करणारे नेते अथवा कार्यकर्ते पक्ष सोडला तर उद्या छगन भुजबळ यांच्यावरही टीकेची झोड सोडतील यात वाद नाही. मात्र भुजबळ जर जाणार असतील तर या सगळ्या शक्यता त्यांनी पडताळून पहिल्या असतीलच.  असो आता, भुजबळ यांनी ट्विटरवर पुन्हा  एंट्री केली आहे. ’माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो, माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे, देशाच्या कानाकोपर्‍यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात, याची मला कल्पना आहे. माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,” अशा शब्दांत भुजबळ यांनी ट्विट करून राजकारणात दमदार असे काहीतरी करण्याचे संकेत दिले आहेत.
भुजबळांनी अनेक राजकीय वादळं पाहिली आहेत. शिवसेनेपासून ते काँग्रेस मधील भल्या भल्या धुरीणांना ते पुरून उरलेले आहेत. त्यांना जेलमध्ये दीर्घकाळ ठेवणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र तोही त्यांनी पचवला आहे. त्यांच्यात मुळात शिवसेनेचा पिंड असल्याने ते इतकं म्याव होवून नक्कीच बसणार नाहीत. मात्र नारायण राणे यांच्याइतका उतावळेपणही करणार नाहीत. राष्ट्रवादीत राहण्याचे असो की शिवसेनेत स्वगृही जाण्याचे असो ते जे कोणतेही पाऊल  टाकतील ते विचार करूनच टाकलेलं असेल हे नक्की….
– निलेश झालटे, मुंबई