मुंबई । बहुजन समाजाचे नेते आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत विराट मोर्चाच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्याचा निर्धार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या आज झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राणीचा बाग ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा समता सैनिकांनी निर्धार व्यक्त केला.
छगन भुजबळ यांच्या मुक्ततेसाठी भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली. आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी जिरवा, माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी खासदार देवीदास पिंगळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनावणे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट घेत आपले गार्हाणे मांडले. आमचा विकास कारागृहात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, असे त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंसमोर गार्हाणे मांडले. भुजबळांना जामीन कधीच मिळायला हवा होता. आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असा सल्ला राज ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.
या बैठकीत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मार्च महिन्यात मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्षांतील भुजबळांचे समर्थक असलेले आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेत्यांची राज्यस्तरीय समिती नेमून या समितीच्या बैठकीमध्ये मोर्चाची तारीख जाहीर केली जाणार आहे. मोर्चासाठी समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांना प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आली तसेच विभागीय स्तरासह प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली.
छगन भुजबळ यांनी कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे.
– राज ठाकरे,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
छगन भुजबळ यांच्यावर सद्याच्या व्यवस्थेकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू असून यामागे राजकीय षडयंत्र आहे. मात्र, आमचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे.
– बापू भुजबळ, समता परिषद