इंदापूर । राज्याचे माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ ह देशातील ओबीसींचे एकमेव कणखर व जाणते नेते असल्यामुळे भुजबळाना जेलमधे खोट्या गुन्ह्यात अडकवून राज्यातील ओबीसींचा आवाज दाबला जात आहे. भुजबळांची सुटका लवकर न झाल्यास पुढील मोर्चा विधानभवन, पुणे येथे धडकार असून सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे काम राज्यातील ओबीसी समाज करणार असल्याचा इशारा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा कृृषि उत्पन्न बाजार समीतीचे संचालक गणेश झगडे यांनी इंदापूर येथे ओबीसी मोर्चाला संबोधित करताना दिला. मंगळवारी सकाळी 12 वाजता इंदापूर अकलूज नाका, श्रीराम चौकापासून भुजबळ समर्थकांच्या ओबीसी मोर्चाला सुरूवात झाली. हजारोंच्या संखेने भुजबळ समर्थक मोर्चात सामील झाले होते. हा मोर्चा संभाजी चौक, नेहरू चौक मार्गे खडकपूरा ते बाबा चौक मार्गे पुणे-सोलापूर हायवेवर इंदापूर पंचायत समीती समोर आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
विविध ओबीसी संघटनांचा पाठींबा
मोर्चासाठी सावता परिषद माढा, बागवान जमियत बहुउद्देशिय संस्था इंदापूर, दलीत संघटना निमगाव केतकी, जैन संघटना शेळगाव, दौंड तालुका व बारामती तालुका समता परिषद, नाभिक संघटना इंदापूर तालुका, तेली समाज, वडार समाज, कुंभार समाज, सुतार व सोनार समाज संघटनांनी ओबीसी मोर्चाला पाठींबा जाहीर केला. भविष्यात राज्यभर तालुका व जिल्हास्तरावर मोर्चे होणार असल्याची माहीती निवृत्ती गायकवाड, प्रशांत मस्के व बाबासाहेब भोंग यानी दिली.
भुजबळांना संपविण्याचा डाव
यावेळी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव म्हणाले, छगन भुजबळ हे व्यक्ती नव्हे, तर एक विचार आहेत. सरकारने व्यक्ती म्हणून त्यांना आकसापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना संपविण्याचा डाव आखला आहे. परंतु, व्यक्ती म्हणून भुजबळांना हे सरकार कदाचित संपवेल, परंतु त्यांचे विचार कधीच संपवता येणार नाहीत. आजचा मोर्चा हा ओबीसींचा सरकारविरूद्ध एल्गार आहे.
द्वेषापोटी तुरूंगात डांबले
एल्गार मोर्चाला संबोधित करताना गणेश झगडे म्हणाले, भविष्यात राज्यातील व देशातील सर्व ओबीसी समाज भुजबळांच्या पाठशी उभा राहिल्यास या सरकारला डोईजड होईल, या द्वेशापोटी भुजबळांवर खोटे आरोप लावून जाणीवपूर्वक ओबीसींचे नेतृृत्व संपविण्यासाठीच या सरकारने 22 महिन्यांपासून त्यांना तुरूंगात डांबले आहे. राज्यातील ओबीसींचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खोट्या आरोपातून भुजबळ साहेबांची तातडीने सुटका करण्यात यावी. अन्यथा पुढील महामोर्चा पुणे विधानभवन येथे लाखोंच्या संख्येने धडकेल. यामुळे योग्य निर्णय राज्य सरकारने घ्यावा.
या ठिणगीचा मोठा भडका उडेल
या मोर्चाच्या माध्यमातून आज छोटीशी ठीणगी आम्ही इंदापुरात टाकली असून सरकारने योग्य निर्णय घेवून भुजबळ साहेबांची लवकर सुटका न केल्यास या ठिणगीचा मोठा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देवराज जाधव यांनी दिला. यावेळी शालेय विद्यार्थिनी रेषमा भोंग हिनेे आपले विचार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे इंदापूर शहराध्यक्ष राऊत, संजय शिंदे, रमेश शिंदे, बाबासाहेब भोंग, पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेता निवृृत्ती गायकवाड, कर्मयोगीचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर, ज्येष्ठ नेते हनुमंत बनसुडे यांची भाषणे झाली. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र चांदणे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, इंदापूर पंचायत समिती माजी उपसभापती कांतीलाल बोराटे, माजी नगरसेवक महादेव शिंदे, इंदापूर नगरपरिषद विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, नगरसेवक स्वप्निल राऊत, बाबा जाधव, महादेव व्यवहारे, विशाल चव्हाण, नितिन आरडे, मुन्नाभाई बागवान, पप्पू पवार, अस्लमभाई बागवान, अप्पा माने, राहुल शिंदे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.