पुणे : छगन भुजबळांना लवकर जामीन मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील. छगन भुजबळ लढवय्ये नेते असून, त्यांच्यासारखा नेता जेलबाहेर आलाच पाहिजे, असे वक्तव्य समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी केले आहे. महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कांबळे यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
कायद्याच्या कचाट्यात अडकले
दिलीप कांबळे म्हणाले, ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलम रद्द झाल्याने आता भुजबळ लवकरच बाहेर येतील. भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते कायद्याच्या कचाट्यात अडकले, मात्र लवकरच ते जेलबाहेर येतील. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप असताना एका जबाबदार मंत्र्याने असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) 14 मार्च 2016 रोजी अटक केली होती. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय करत आहे.