भुजबळ छोडो आंदोलन करा!

0

राज ठाकरेंचा भुजबळसमर्थकांना सल्ला

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याप्रश्‍नी तूर्त काही भूमिका घेण्यास मात्र राज यांनी नकार दिला. भुजबळ यांच्या जामीनअर्जावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्ड्रिग (पीएमएलए) न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

समर्थक मुख्यमंत्र्यांनाही भेटणार
भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी समर्थक सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी राज ठाकरे यांची ’कृष्णकुंज’वर भेट घेतली. आमचा विकास तुरुंगात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, असे गार्‍हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले. त्यावर भुजबळ यांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. दोन वर्षांपासून सूडाचे राजकारण सुरू आहे. भुजबळ हे त्याचे बळी आहेत. त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहोत. नाशिकमध्ये ’अन्याय पे चर्चा’ सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत, असे समर्थकांनी सांगितले.

भुजबळांच्याबाबत सूडाचे राजकारण : समर्थक
तुम्ही या प्रश्‍नी काहीतरी भूमिका घ्या अशी विनंती राज ठाकरे यांना भुजबळसमर्थकांनी केली. मात्र तूर्तास मी काही बोलणार नाही असे राज यांनी स्पष्ट केले. तसेच भुजबळ समर्थकांचे म्हणणेही त्यांनी ऐकून घेतले. भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री होते. त्यांना तुरुंगात डांबल्यामुळे नाशिकचा विकास खुंटला आहे. तसेच त्यांच्याविरोधात सूडाचे राजकारण केले जाते आहे असा आरोप भुजबळ समर्थकांनी केला. एवढेच नाही तर राज ठाकरेंनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. या भेटीच्या वेळी राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना नंतरच्या टप्प्यात मनसेला राष्ट्रवादीनेच पाठिंबा दिला होता. मात्र गेल्यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि राज ठाकरे यांच्या नाशिक विकासाचे मॉडेलही लोकांनी नाकारले होते.

छगन भुजबळांवरचा खटला हा आर्थिक विषयावरचा आहे, त्यामुळे या प्रकरणात त्यांना कधीच जामीन मिळायला हवा होता. तुम्हाला चौकशी करायची असेल तर भुजबळांच्या कस्टडीची गरज नाही. भुजबळसमर्थक जोडो अभियानापेक्षा ते नाव भुजबळ छोडो असे असायला हवे होते. समर्थक जोडून काय होणार?
– राज ठाकरे, मनसेप्रमुख