भुजल पातळी संवर्धनासह जलबचतीचा दिला संदेश

0

भुसावळ । तालुक्यातील किन्ही येथील वत्सल ऊर्जा आश्रम व भुसावळ येथील ग्रीन अर्थ या संस्थेतर्फे जागतिक वनदिन, जलदिन व हवामान दिनाचे औचित्य साधून किन्ही येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. किन्ही येथील उभारण्यात येत असलेल्या वत्सल ऊर्जा आश्रमाच्या प्रांगणात हरीत पट्टा उभारणीचे कार्यास सुरुवात झाली असून येथील पाणी पुरवठा करणार्‍या कुपनलिका व हॅण्ड पंपाचे जलपूजन सर्वोदय वाचनालयाचे अध्यक्ष भागवतराव भिरुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजल पातळीचे संवर्धनासह जलबचतीचा संदेश दिला.

हरित पट्टा निर्माण करणार
तसेच करंज या वातावरणातील कार्बन वायू शोषून ऑक्सीजन देणार्‍या व सोबतच बायोडिझेल व हिरवळीचे खत उपलब्ध करुन देणार्‍या विविध वृक्षाच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन वृक्षांचा हरित पट्टा मोकळ्या जागेवर निर्माण करण्याचा ग्रीन अर्थच्या स्वयंसेवकांनी निर्धार केला व त्यानुसार कार्यवाही सुरु केली.

जलशुध्दीकरणासाठी शेवग्याच्या बियांचे प्रयोग
या आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर शेंगा व बिया देणार्‍या शेवगा जातीच्या रोपांच्या लागवडीस उर्जा आश्रमाच्या प्रांगणात सुरुवात करण्यात आली आहे. या शेवगा झाडाच्या बिया संकलित करण्यात येऊन त्याचे पावडर करण्यात येईल व ते वापरुन पिण्याचे पाणी स्वच्छ व शुध्द करण्याच्या गुणधर्माचा भविष्यात अभ्यास व त्याचे विविध
प्रयोग करण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती
या संशोधनाचा व गुणधर्माचा सातपुड्यातील दुर्गम भागातील वाड्या व वस्त्यांवर राहणार्‍या व अशुध्द पाणी पिण्यात आल्यामुळे रोगराईस बळी पडणार्‍या आदिवासी बांधवांच्या मुला बाळांचे आरोग्य जपण्याचे हेतूने या संशोधनाची पडताळणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र भिरुड, भागवत भिरुड, डॉ. विनोद ढोले, राजेंद्र ढोले, वत्सल ऊर्जा आश्रमाचे मानद संचालक सुरेंद्र चौधरी, मिलींद भारंबे, ग्रीन अर्थचे संजिव पाटील, प्रा. वसंत खरे, विवेक वर्णीकर यांची उपस्थिती होती.