भुलेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता

0

यवत । श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री क्षेत्र भुलेश्वर येथे राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो शिवभक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. सोमवारी (दि. 21) श्रावण महिन्याची सांगता झाली. या काळात दर्शनास आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, केळीची साले, फायबरच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिक पिशव्या, कागद आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात केला होता.

दौंड तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हा कचरा गोळा करीत मंदिर परिसराची साफसफाई केली. मंदिर परिसर तीन तासात स्वच्छ केला. मंदिर परिसरात गेल्या महिनाभरापासून हा कचरा साचला होता. तो गोळा केल्याने आता मंदिर परिसर चकाचक दिसत आहे. दरवर्षी भुलेश्वर येथील श्रावण महिन्यातील यात्रा संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा ध्यास या उपक्रमाद्वारे मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे. त्यांचे हे दुसरे वर्षे आहे. या स्वच्छता अभियानात पुणे जिल्हा युवकचे सचिव मयुर सोळसकर, दौंड तालुका अखिल भारतीय विद्यार्थी आघाडीचे कार्याध्यक्ष अतुल आखाडे, उपाध्यक्ष सुरज चोरघे, विशाल राजवडे, संतोष आखाडे, विनोद राजवडे, राहुल शेळके, रामदास जाधव, हर्षल जगताप आदी युवक सहभागी झाले होते.