भुवनेश्‍वर, धवनला विश्रांती

0

नागपूर । अखेरच्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोहचलेल्या कोलकाता कसोटीत श्रीलंकेने अंधुक प्रकाशाच्या मदतीने सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. दुसर्‍या डावात भारताच्या भुवनेश्‍वर कुमारने टिच्चून मारा करत श्रीलंकेच्या संघाला भगदाड पाडलं. मात्र, लंकेच्या संघाला ऑलआऊट करण्यात भारताला यश आलं नाही. अखेर शेवटची काही षटकं संयमीपणे खेळून काढत लंकेने पराभवाची नामुष्की टाळली. कोलकाता कसोटीनंतर बीसीसीआयने आगामी कसोटीकरिता भुवनेश्‍वर कुमार आणि शिखर धवनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भुवनेश्‍वर कुमार हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, त्यामुळे आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही, तर शिखर धवनने वैयक्तिक कारणासाठी दुसर्‍या कसोटीतून विश्रांती देण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. जी मागणी बीसीसीआयने मान्य केल्याचं समजतंय. 24 ते 28 नोव्हेंबरदरम्यान नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

विराटला फायदा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणार्‍या विराट कोहलीला फायदा झाला आहे. आयसीसीच्या टेस्ट रॅकिंगमध्ये विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेला आहे, तर रवींद्र जडेजा दुसर्‍या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसर्‍या इनिंगमध्ये नाबाद शतक मारले होते. याचबरोबर विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकंही पूर्ण केली. वनडे आणि टी-20मध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा ओपनर शिखर धवनही दोन क्रमवारी वर म्हणजेच 28व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तामीळनाडूच्या विजय शंकरला संघात स्थान
1 भुवनेश्‍वर कुमारच्या जागेवर संघात तामीळनाडूचा फलंदाज विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलंय. मात्र, प्रत्यक्ष सामन्यात विजय शंकरला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. संघात मुरली विजय हा राखीव सलामीवीर असल्याने दुसर्‍या कसोटीत विजयला संघात जागा मिळेल, तर भुवनेश्‍वर कुमारच्या जागी इशांत शर्माला संघात जागा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
2 विजय शंकर लेफ्टी असून तो मीडियम पेसर गोलंदाज आहे. विजय शंकर जरी आता प्रेशरमध्ये आपली ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला असला तरीही तो ऑफ स्पिन गोलंदाजदेखील आहे. मात्र, नंतर त्याने आपली स्टाइल बदलली आहे. विजय शंकरचे वडील स्वतः क्रिकेटर होते. त्याचा भाऊ अजय तामीळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या लोव्हर डिव्हिजनमध्ये क्रिकेट खेळला आहे.
3 होम पिचवर रन बनवण्याचा चांगला खेळ आहे तसेच 32 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 2017 मध्ये विजय हैदराबाद सनरायझर्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. या अगोदर 2014 मध्ये आयपीएलमध्ये सर्वात अगोदर चैन्नई सुपर किंग्समधून खेळ दाखवला. आतापर्यंत तो फक्त एकच मॅच खेळू शकला आहे. राहुल द्रविड हा विजयचा आयडियल आहे.
4 खासकरून राहुलने एडिलेडमध्ये खेळलेली 233 आणि 72 धावांची मॅच त्याला सर्वाधिक पसंद आहे. त्याचं असं म्हणणे आहे की अनेकदा त्याचा हा गेम मला प्रेरणा देत असतो. यावर्षी विजय तामीळनाडूचा कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने विजय हजारे आणि देवधर ट्रॉफी जिंकली आहे.

…तर भारताला सामना जिंकता आला असता -राहुल
लोकेश राहुल – शिखर धवन जोडीने भारताला दुसर्‍या डावात चांगली सुरुवात करुन दिली भारताविरुद्धची कोलकाता कसोटी अनिर्णित राखण्यात श्रीलंकेच्या संघाला यश आलू. दुसर्‍या डावात भारतीय गोलंदाजांच्या भेदक मार्‍यासमोर खिंड लढवत श्रीलंकेने पराभवाची नामुष्की टाळली. कोलकाता कसोटीचे पहिले दोन दिवस हे पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे वाया गेले होते. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहील, असा अंदाज सर्वांना वर्तवला होता. मात्र, दुसर्‍या डावात कर्णधार विराट कोहलीचे शतक, डाव घोषित करण्यासाठी साधलेली वेळ आणि भुवनेश्‍वर कुमारने केलेला टिच्चून मारा यामुळे अखेरच्या दिवशी कसोटीत अचानक रंगत आली. सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 विकेटची आवश्यकता असताना अंधूक प्रकाशाने खोडा घातला आणि दोन्ही पंचांनी खेळाडूंच्या सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताचा सलामीवीर लोकेश राहुलच्या मते अखेरच्या दिवशी आणखी 5-6 षटकांचा खेळ झाला असता तर भारतीय संघाने सामन्यात नक्कीच बाजी मारली असती.