भुशी धरणाच्या पायर्‍यांवर जाऊ न शकल्याने पर्यटकांचा हिरमोड

0

लोणावळाः भूशी धरण परिसरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने डोंगरभागातून वेगाने धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरुन वेगाने पाणी वाहू लागले आहे. पर्यटकांना धरणाच्या पायर्‍यांवर जाणे व बसणे मुश्किल झाल्याने पर्यटकांची घोर निराशा झाली. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता या ठिकाणी लोणावळा शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

तसेच शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवसात सायंकाळी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग पर्यटकांकरिता बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने जाहीर केल्यानंतर या धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सांडव्यावरुन वेगाने पाणी पायर्‍यांवर येऊ लागल्याने या पायर्‍यांपर्यंत जाणे व त्यावर बसणे मुश्किल झाल्याने या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची निराशा झाली.