भुसावळ नगरपालिकेचा नऊ लाख 39 हजार 360 रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी ; जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांचा बहिष्कार ; वर्षभरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
भुसावळ- भुसावळकरांवर कुठलाही करवाढीचा बोजा न टाकता पालिकेत सत्ताधार्यांनी अर्थसंकल्प सादर करीत जनतेला मोठा दिलासा दिला. 159 कोटी 28 लाख चार हजार 768 रुपये खर्चाच्या व नऊ लाख 39 हजार 360 रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला सत्ताधार्यांनी गुरुवारी सभागृहात मंजुरी दिली. जनआधार विकास पार्टीच्या खंडपीठात दिलासा मिळालेल्या चार नगरसेवकांना अर्थसंकल्पीय सभेचा अजेंडा न मिळाल्याने नूरजहाँ आशिक खान वगळता सर्व नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकत पालिका प्रशासनाला तसे निवेदनही दिले. सत्ताधारी नगरसेवकांनी पालिकेची हद्दवाढ होणार्या भागातून मिळणार्या महसुलासह गोपाळ नगरातील व्यापारी संकुलातून येणारे उत्पन्नही अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी केली. वर्षभरात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम मार्गी लागण्याची ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.
करवाढ नसल्याचा शहरवासीयांना दिलासा
गोपाळ नगरातील पालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी अर्थसंकल्पीय सभेला सुरुवात झाली. लेखापाल संजय बाणाईते यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. पालिकेला विविध स्वरूपाच्या करातून येणारे उत्पन तसेच होणार्या नियोजित खर्चाची माहिती देण्यात आली. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहर विकासाचा निरंतर ध्यास असल्याचे सांगत पालिकेने कोणत्याही करात वाढ केली नसल्याने नागरीकांवर कुठलाही बोजा पडणार नसल्याचे सांगितले.
छत्रपतींचा व्हावा पुतळा -लोणारी
नगरसेवक युवराज लोणारी यांनी अर्थसंकल्पात एक कोटी रुपये खर्चाची छत्रपतींच्या पुतळ्यासाठी तरतूद केली असून वर्षभरात पुतळा उभारण्याची मागणी केली तसेच भुसावळ पालिकेची हद्दवाढ प्रस्तावीत असून या भागातून येणारे उत्पन्न तसेच गोपाळ नगरातील गाळ्यांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लावून हेदेखील उत्पन्न अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी केली. भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी लोणारी यांच्या सूचनेला अनुमोदन दिले. नगरसेवक तथा सी.ए.दिनेश राठी यांनी पालिकेला मिळणार्या अनुदानातून 10 टक्के निधीतून शहराच्या सिग्नल व्यवस्थेवर खर्च करावा, असे सूचवले तर लेखापालांनी तशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली. गटनेता मुन्ना तेली यांनी शहरातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात त्यामुळे सर्वच ठिकाणी एकाच प्रकारच्या कराची आकारणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्ताधार्यांची नगरसेवक कोठारींकडून कोंडी
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सभेनंतर पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली व्हावी, अशी मागणी केली तर नगराध्यक्षांनी यापूर्वीच झालेल्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली मात्र हल्ला सर्वसाधारण 13 रोजी झाली असताना हल्ला 14 रोजी झाला मग सभागृहाने श्रद्धांजली केव्हा वाहिली? असा प्रश्न कोठारींनी उपस्थित केला.
जनआधारच्या नगरसेवकांचा सभेवर बहिष्कार
जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांच्यासह चौघा नगरसेवकांना खंडपीठात दिलासा मिळाल्यानंतरही त्यांना सभेचा अजेंडा न मिळाल्याने त्यांनी गुरुवारच्या बैठकीवर बहिष्कार टाकत पालिका मुख्याधिकार्यांना पत्र दिले तसेच सभा रद्दची मागणीही केली. विरोधी गटाच्या नूरजहाँ आशिक खान यांनी मात्र सभेला हजेरी लावत स्वाक्षरीही केली मात्र काही वेळाने त्याही निघून गेल्या.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर पीठासन अधिकारी रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची उपस्थिती होती.
विरोधकांचे टिका हेच काम -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, विरोधकांचे टीका हेच एकमेव काम आहे. सभेचा अजेंडा काढला त्यावेळी पालिकेत न्यायालयाचा निर्णय आलेला नव्हता मात्र आम्ही टीकाकारांकडे दुर्लक्ष करणार असून शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे. नियोजित जागेवर सर्व परवानग्यांची पूर्तता करून छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.