शहरात पाणीपुरवठ्याला सुरुवात ; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
भुसावळ- तापीच्या बंधार्याने तळ गाठल्याने शहरवासीयांना 45 डिग्री तापमानात पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली होती. शहरवासीयांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती पाहता आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकार्यांना साकडे घातल्यानंतर हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आले होते. शुक्रवारी रात्री तापीच्या बंधार्यात पाणी पोहोचल्यानंतर शनिवारी सकाळपासून पाण्याची उचल करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी शनिवारी हनुमान नगरासह अन्य भागात तर रविवारी जळगाव रोड, गंगाराम प्लॉट व वांजोळा रोड भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. शहरात पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आता शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तापीच्या बंधार्यात पोहोचले पाणी
30 एप्रिल रोजी हतनूर धरणातून 12 दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. एक हजार डे क्युसेस या वेगाने सलग पाच दिवस विसर्ग झाल्याने दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, रेल्वे प्रशासन आणि भुसावळ पालिकेच्या बंधार्यात पाणी पोहाचले आहे. दोन दिवसांत पालिकेचा बंधारा ओव्हरफ्लो होऊन साकेगाव शिवारातील जळगाव एमआयडीसीच्या बंधार्यात जलसाठा पोचणार आहे. दरम्यान पालिकेच्या बंधार्यात समाधानकारक पातळी गाठली गेल्याने शुक्रवारी रात्री पाच दिवसांपासून बंद असलेली पंपींग रॉ वॉटर यंत्रणा शनिवारी सकाळी कार्यान्वित करण्यात आली. शनिवारपासून रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील सर्व भागांना रोटेशननुसार पाणीपुरवठा होईल. शहरासाठी हतनूरमधून मिळालेले हे आवर्तन आता पुढील 40 दिवस अर्थात जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. जून महिन्यातील दुसर्या आठवड्यानंतर पाऊस होऊन बंधार्यातील जलासाठा वाढेल. यानंतर मात्र हतनूरच्या आवर्तनाची गरज भासणार नाही, असा विश्वासही पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सहा दिवसांआड पुरवठा
हतनूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असला तरी यापूर्वी झालेल्या निर्णयानुसार शहराला पाच ते सहा दिवसांआड पाणी मिळणार आहे. यामुळे टंचाईची स्थिती यापुढील काळातही कायम राहिल, असा अंदाज आहे. बंधार्यातील जलसाठा जूनच्या दुसर्या आठवड्यापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.