पालिकेच्या सभेनंतर वाटाघाटी झाल्या यशस्वी ; पत्रकार परीषदेत आमदार संजय सावकारेंसह नगराध्यक्ष रमण भोळेंनी मांडली भूमिका
पालिकेच्या विशेष सभेकडे जनआधारच्या नगरसेवकांनी फिरवली पाठ ; अटल योजनेच्या कामाला लवकरच होणार सुरुवात
भुसावळ । शहरवासीयांना अमृत ठरणार्या अटल योजने संदर्भात पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत निविदेपेक्षा जैन एरिगेशनचे दर १२ टक्के जादा असल्याने सत्ताधार्यांनी हा भार शहरवासीयांना परवडणारा नसल्याचे सांगत संबंधितांशी वाटाघाटी वा पुर्ननिविदा काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र जळगावच्या जैन एरिगेशनतर्फे सभागृहात आलेल्या चार सदस्यांशी सत्ताधार्यांनी योजनेच्या निविदेबाबत सकारात्मक वाटाघाटी करीत १२ टक्क्यांऐवजी सात टक्क्यापर्यंत रक्कम तडजोड करण्यात यश मिळवल्याची माहिती सायंकाळी पत्रकार परीषदेत आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.
पालिकेला छावणीचे स्वरूप ः गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेत झाजेला दुजाभाव पाहता जनआधार अटल योजनेची सभा गाजवेल, अशी शक्यता असल्याने पोलिसांनी पालिकेच्या आवारासह सभागृहात कडेकोट बंदोबस्त लावला होता मात्र जनआधारनेे सभेवरच बहिष्कार टाकून सत्ताधार्यांना आश्चर्याचा धक्का दिला. जनआधारच्या एकमेव नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी या सभेला उपस्थित असल्यातरी त्या सत्ताधार्यांच्या तंबूत दाखल दिसल्या. सत्ताधारी भाजपाचे ३१ नगरसेवक उपस्थित होते तर सोनी बारसे या अनुपस्थित तर अरुणा सुरवाडे रजेवर असल्याने त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.
स्वीकृत नगरसेवकांच्या सुचनेला सर्वांचे अनुमोदन
पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ११.०८ मिनिटांनी प्रत्यक्षात सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. पीठासन अधिकारी रमण भोळे अध्यक्षतेस्थानी होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर उपस्थित होते. स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी अटल योजनेच्या निविदा जैन ईरीगेटशन सिस्टीमने १२ टक्के जादा दराने भरल्याने ही रक्कम पालिकेला परवडणारी नसल्याचे सांगत संबंधिताशी वाटाघाटी कराव्यात व ही रक्कम सहा टक्क्यांपर्यंत आणावी अथवा पुर्ननिविदा काढावी, अशी सूचना मांडली. त्यास सभागृहाने एकमताने अनुमोदन दिले. भाजपाचे ३१ नगरसेवक तर जनआधारच्या एकमेव पूजा राजू सूर्यवंशी सत्ताधार्यांच्या बाजूने बसल्या होत्या.
जनआधारचा सभेवर बहिष्कार
पालिकेने तीन दिवस राबवलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत दुजाभाव झाल्याने जनआधारच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. गोरगरीबांचे अतिक्रमण हटवून धनदांडग्यांना अभय दिल्याच्या निषेधार्थ प्रांत श्रीकुमार चिंचकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना निवेदन देण्यात आले.
विरोधकांचेच अतिक्रमण अधिक
सत्ताधार्यांच्या अतिक्रमणाला अभय का? असा प्रश्न विचारला असता आमदार संजय सावकारे यांनी सत्ताधारी नव्हे तर विरोधकांचेच अतिक्रमण अधिक असल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली. गोरगरीबांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
स्वच्छता हीच सेवा पंधरवडा
मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ पंधरवडा सुरू होणार असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. त्यात १७ पासून विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. न.पा.कर्मचारी शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करतील, शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाईल.