रणरणत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती ; रॉ वॉटर यंत्रणा ठप्प
भुसावळ- तापी नदी पात्रात असलेल्या पालिकेच्या बंधार्यातील जलसाठा रविवारी रात्री संपल्याने रॉ वॉटर यंत्रणा बंद करण्यात आली असून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीटंचाई अन् भुसावळकर हे जणू आता समीकरण तयार झाले आहे. एप्रिलच्या प्रारंभीच ही अवस्था असताना मे महिन्यात कसे होणार? या प्रश्नाने नागरीकांच्या मनात घर केले आहे. आधीच हतनूर धरणात साठा अल्प असताना आता लवकरच आवर्तन सुटण्याची शक्यता नसल्याने किमान आठवडाभर नागरीकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पाणी उशाला, कोरड घशाला
फेब्रुवारी महिन्यापासून बंधार्यातील जलसाठा संपल्याने सलग दोनवेळा रॉ वॉटर बंद ठेवण्याची नामुष्की पाणीपुरवठा विभागाला आली तर गत वेळी 15 मार्च रोजी बंधार्यातील साठा संपल्याने वॉटर यंत्रणा बंद झाली होती त्यानंतर आवर्तन सुटलयाने किमान 40 दिवस पाणी पुरण्याची अपेक्षा फोल ठरत 7 मार्चला म्हणजे 19 दिवसांनीच पाणी संपल्याने पुन्हा नागरीकांवर भटकंतीची वेळ आली आहे. दरम्यान, पालिकेने या संदर्भात जिल्हाधिकार्यांना आठवड्यापूर्वीच आवर्तनाची मागणी केल्याचे सांगण्यात आले. शहरातील दक्षिण भागाला 19 दिवसांत केवळ एकवेळा पाणी मिळाल्याचे नागरीकांनी सांगितले तर जामनेररोडसह दक्षिण भागाला सध्या 16 दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याची तक्रारही करण्यात आली. दरम्यान, कासवा गावाने अनधिकृत बंधारा उभारल्यानेही पाणी संपल्याचे समजते.
आवर्तनाची केली मागणी- पिंटू ठाकूर
भुसावळ पालिकेच्या तापी नदीपात्रातील बंधार्यातील जलसाठा संपण्यापूर्वी आवर्तन मिळण्यासाठी गत आठवडयापूर्वीच आवर्तनाची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी आवर्तन सुटणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर म्हणाले.
लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरसेविका नीलिमा सचिन पाटील यांच्या घरातर नगरसेवक अशोक नागराणी आदींच्या कार्यालयावर त्या-त्या भागातील नागरीकांनी मोर्चा काढत पाण्यासाठी तीव्र संताप व्यक्त केला.