बाजारपेठेत विनाकारण वाहनांवर फिरताना दिसल्यास दाखल होणार गुन्हे : वाहनदेखील होणार जप्त -पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी जाहीर झाल्यानंतर तब्बल चार ते पाच दिवसांपासून नागरीक घरातच थांबून आहेत मात्र कुटुंबाच्या उदननिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असलीतरी केवळ सकाळी सहा ते दहा ही वेळ देण्यात आल्यानंतर किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी होत होती. या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असल्याने आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुले ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भुसावळातही किमान 14 ते 16 तास दुकाने उघडी राहणार असल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे व एकदाच किराणा, भाजीपाला, औषधे आदी वस्तूंची खरेदी करावी मात्र विनाकारण छोट्या-छोट्या गोष्टींचे निमित्त करून बाहेर पडल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिला आहे.
…तर पोलिस उगारणार नाहीत काठी
नागरीकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत जाण्याची दिवसभर मुभा आहे मात्र एकापेक्षा जास्त संख्येने विनाकारण नागरीकांनी बाहेर पडून गर्दी करू, नये असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले आहे. रस्त्यावर नागरीक आल्यानंतर त्यांना मारहाण होणार नाही याबाबत संबंधित कर्मचार्यांना सूचना करण्यात आल्या आहेत मात्र क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टींसाठी नागरीक बाहेर पडत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई होवून त्यांची वाहने जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे राठोड म्हणाले.
साईजीवनतर्फे घरपोच डिलीव्हरीची सुविधा
भुसावळातील साईजीवन सुपर शॉपतर्फे नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले असून आवश्यक असलेला किराणा घरपोच पोहोचण्याची हमी संचालक पिंटू कोठारी यांनी दिली आहे. नागरीकांनी 9551104104 या व्हॉटसअॅप नंबरवर आवश्यक किराणा मालाची यादी पत्त्यासह पाठवल्यानंतर नागरीकांना घरपोच किराणा देण्याची हमी कोठारी यांनी दिली आहे.
पालिकेतर्फे शहरात सूचना -मुख्याधिकारी
जीवनावश्यक वस्तू नागरीकांना मिळण्यासंदर्भात पालिकेतर्फे रीक्षाद्वारे अलावून्सींग करून सूचना केल्या जात आहेत. प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्याशी 24 तास दुकाने ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच अनेक व्यापार्यांनीही आपल्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या. नागरीकांनी विनाकारण रस्त्यावरील गर्दी टाळून घरी होम डिलीव्हरी मागवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रस्त्यावर विनाकारण गर्दी टाळा- प्रांताधिकारी
नागरीकांनी विनाकारण रस्त्यावरील गर्दी टाळावी व गरजवेळी एकट्याने बाहेर पडावे, असे आवाहन प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.