भुसावळकरांना सणासुदीत भारनियमनाचा शॉक ; वीज कंपनीविरुद्ध नागरीकांचा एल्गार

0

राज्यात विजेची मागणी वाढली ; प्रकल्पांना कोळशासह पाण्याची अडचण

भुसावळ- राज्यभरातील वीज प्रकल्पांना अपूर्णपणे कोळसा उपलब्ध होत असल्याने वीज निर्मितीवर परीणाम झाला असून दुसरीकडे पाण्याची उपलब्धता नसल्याने वीज निर्मिती घटल्याने राज्यभरात भारनियमनाला सुरुवात झाल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे ऐन सणासुदीत होणार्‍या भारनियमनामुळे संताप व्यक्त होत आहे. भुसावळातही सोमवारपासून आपत्कालीन भारनियमन सुरू आहे. जी- वन ते जी- थ्री या वितरण ग्रुपवर तब्बल साडेआठ तास वीज भारनियमानचा कहर सुरू झाल्याने संतप्त शहरवासीयांचा संतापाचा भडका उडण्याची भीती आहे. सध्या भारनियमन नसलेल्या ए ते डी या ग्रुपवरही येत्या दोन दिवसांत भारनियमन होण्याचे संकेत आहेत. रावेरसह मुक्ताईनगर येथे शिवसेना व युवा सेनेतर्फे भारनियमनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

भुसावळकर संतप्त ; दिवसातून दोन ते तीनवेळा भारनियमन
विजेची तूट भरून काढण्यासाठी महावितरणला जी 1 ते जी 3 व झेड या वितरण ग्रुपवर भारनियमन करावे लागत असल्याने शहरवासी संतप्त झाले आहेत. बुधवारपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत असल्याने भाविकांनी भारनियमन न करण्याची मागणी केली आहे. दररोज सकाळ, दुपार व सायंकाळ या तीन टप्प्यात तब्बल साडेआठ तासांचे भारनियमन या ग्रुपवर सुरू झाले आहे. भुसावळ शहरातील 13 पैकी पाच तर विभागातील भुसावळ ग्रामीण, जामनेर शहर आणि ग्रामिण, पहूर ग्रामिण या उपविभागातील 102 पैकी 42 फिडरवर भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहे. कोळशाची टंचाई कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत पून्हा ए ते डी या ग्रुपवरही भारनियमन होण्याचे संकेत आहेत.

भारनियमनाविरोधात मुक्ताईनगरात शिवसेनेचा एल्गार
मुक्ताईनगर- ऐन नवरात्रीसारख्या महत्वपूर्ण सणाच्या सुरवातीलाच तालुक्यात वीज कंपनीतर्फे दररोज रात्री 7 ते 10 या वेळेत भारनियमन सुरू करण्यात आले असून ते तत्काळ बंद करावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे उपकार्यकारी अभियंता डी.वाय.खाचणे यांना देण्यात आला. बुधवारपासून पावन अशा नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे तसेच येत्या 15 दिवसात शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा देखील होतील त्यामुळे नवरात्रोत्सवात भाविकांचे अतोनात हाल होतील व विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या अडचणी निर्माण होतील. ऐन सणासुदीच्या काळातील हे जाचक भारनियमन थांबवा अन्यथा शिवसेनेतर्फे उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातुन देण्यात आला. प्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, विधानसभा संघटक अमरदीप पाटील, तालुका संघटक प्रवीण चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेश टोंगे, नगरसेवक संतोष मराठे, शाखाप्रमुख स्वप्निल श्रीखंडे, प्रफुल्ल पाटील, धीरज जावरे, गौरव तळेले आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

रावेरमध्ये युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा
रावेर- नवरात्रोत्सवातील भारनियमिन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनातर्फे देण्यात आला आहे. उप कार्यकारी अभियंत्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर भरनियम लादण्यात आल्याने नागरीकांचे हाल होत आहे. भारनियमन बंद न केल्यास शुक्रवार, 12 रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, प्रवीण पंडित, राकेश घोरपडे, मनोज वरणकर, जयेश पाटील, मुकेश पाटील, राहुल कोंडी, योगी धनके, गणेश महाजन, देविदास पाटील, ईश्वर शर्मा, नीलेश पाटील, बाळू पाटील, सुनील पाटील, अमोल कोळी, शुभम कोडी, गणेश कोंडी यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

युवा शक्ति फांउडेशनतर्फेही निवेदन
शहरातील उप कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात युवा शक्ति फांउडेशन अध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी यांच्यातर्फे देखील निवदन देऊन भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष पिंटू महाजन यांनी देखील त्याबाबत मागणी केली आहे.