भुसावळ- पालिकेच्या तापी नदीतील बंधार्याला जलसाठा दोन दिवसांवर आला असतानाच हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलास ामिळाला आहे. हतनूर धरणातून शहरासह रेल्वे, दीपनगर औष्णिक केंद्रासाठी गुरुवारी आवर्तन सोडण्यात आले असून सलग चार दिवस एक हजार डे क्युसेस व पाचव्या दिवशी 400 डे क्युसेस या प्रमाणे पाच दिवसांत 10.78 दलघमी पाण्याचे आवर्तन मिळणार आहे.
पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती
शहरवासीयांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असलातरी अनेक ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे पाणीपुरवठा करण्यासाठी व्यत्यय येत आहे. सध्या पालिकेच्या बंधार्यातून केवळ ताशी चार लाख लिटर पाण्याची उचल होत आहे. या अल्प उचलमधून काही अंशी शहराची तहान भागवली जाते. शहरातील दररोजची किमान दोन कोटी 40 लाख लिटर पाण्याची गरज पाहता सध्या होत असलेली उचल शहराची तहान भागवू शकत नाही. दरम्यान पालिकेने पाटबंधारे विभागासह जिल्हाधिकार्यांना पंधरवड्यापूर्वीच आवर्तनासाठी पत्रव्यवहार केल्यानंतर गुरुवारी हतनूर धरणातून एक हजार डे क्युसेसने आवर्तन सोडण्यात आले. 30 मे ते 2 जूनपर्यंत चार दिवस प्रती दिवस एक हजार क्युसेस तर 3 जून रोजी 400 क्युसेसचे आवर्तन दिले जाणार आहे. शहरातील तापी बंधार्यात हे आवर्तन 5 जूनपर्यंत पोहचून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.