भुसावळकरांनी स्वयंस्फूर्तीने पाळला कडकडीत बंद

0

भुसावळ : भुसावळात दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शहरवासीयांनी 14 ते 17 दरम्यान स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय बुधवारी प्रांताधिकार्‍यांच्या दालनात आमदार तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भुसावळकरांनी पहिल्या दिवशी गुरूवारी कडकडीत बंद पाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू
नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यासाठी 14 ते 17 मे दरम्यानच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दवाखाने तसेच औषधी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता शिवाय सकाळी सहा ते नऊ दरम्यान दुध डेअरी सुरू राहील, असे ठरवण्यात आले होते तर त्या व्यतिरीक्त किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट तसेच अन्य दुकाने कडकडीत बंद ठेवण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शवल्याने गुरुवारी व्यापार्‍यांनी स्वयंसफूर्तीने पाळण्यात आलेल्या बंदला प्रतिसाद दिला.

आमदारांनी सायकलवर रपेट मारून घेतला आढावा
आमदार संजय सावकारे यांनी गुरुवारी शहरातील बंदचा सायकलीवर रपेट मारून आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ कर्मचार्‍यांकडून बंदबाबत माहिती जाणून घेतली तसेच अन्य भागातही सायकलने रपेट मारली. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घरातच थांबावे, असे कळकळीचे आवाहनही आमदार सावकारे यांनी केले आहे.