भुसावळकरांवर जलसंकट ; पावसाळ्यात भटकंतीची वेळ

0

तापी बंधार्‍यातील पाणी संपले ; आता आवर्तनावर भिस्त

भुसावळ- शहरवासीयांवर भर पावसाळ्यात भटकंतीची वेळ आली आहे. तापीच्या बंधार्‍यातील पाणी संपल्याने आता शहरवासीयांना पुन्हा हतनूरच्या आवर्तनाची प्रतीक्षा करावी लागणार असून तोपर्यंत पुन्हा ये रे माझ्या मागल्याची प्रचिती आल्याने संताप व्यक्त होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापीबंधार्‍यातील जलसाठा पूर्णपणे संपल्याने रविवारी रात्री रॉ वॉटर व पाणीपुरवठा यंत्रणा बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आवर्तनानंतर मिळणार शहरवासीयांना दिलासा
शहराला हतनूर धरणाकडून मिळणारे शेवटचे आवर्तन वेळेत न म्ळिाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍यातील जलपातळी घसरल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रॉ वॉटर पंपींग हाऊसमधील 300 अश्वशक्तीच्या पंपांतून दर ताशी 11 लाख लिटर पाण्याची उचल होते मात्र पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने रविवारी केवळ सहा ते सात लाख लिटर पाण्याची उचल झाली. दुपारनंतर पुन्हा जलपातळी खालावल्याने पाण्याची उचल पुन्हा घटली. अपेक्षित पाणीउचल होत नसल्याने 300 अश्वशक्तीचा वीजपंप नादुरुस्त होण्याची भीती असल्याने रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास यंत्रणा बंद करण्यात आली. सोमवारी शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. हतनूर धरणातून शुक्रवारी सोडलेल्या आवर्तनाचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत ही यंत्रणा बंद राहणार आहे. उन्हाळ्याच्या पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या काळापर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होण्याचा कटू अनुभव भुसावळकरांना नेहमीच येत आहे.