भुसावळ : भुसावळात दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शहरवासीयांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरीकांना आवाहन करूनही नागरीक तसेच कन्टेन्मेंट झोनमधील नागरीक घराबाहेर पडतच असल्याने शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याबाबत निर्णय घेतला आहे. बुधवार, 13 रोजी प्रांताधिकार्यांच्या दालनात आमदार तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. शहरात 14 ते 17 मे दरम्यान केवळ दवाखाने, औषधी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय झाला तसेच सकाळी सहा ते नऊ दरम्यान दुध डेअरी सुरू राहणार असून त्या व्यतिरीक्त किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट तसेच अन्य दुकाने कडकडीत बंद ठेवण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शवली.
रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय
आमदार संजय सावकारे यांनी या संदर्भात ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले की, शहरात कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या निश्चितच चिंतेची बाब आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरवासीयांना घरातच थांबणे गरजेचे आहे मात्र आवाहनानंतरही नागरीक घराबाहेर बाहेर पडत असल्याने त्यावर कोरोनाचा फैलाव वाढत आहे मात्र संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आता कडकडीत बंद हाच उपाय आहे. 14 ते 17 मे दरम्यान शहरवासी स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार असून या कालावधीत केवळ दवाखाने तसेच औषध विक्रीची दुकाने सुरू राहतील तर सकाळी सहा ते नऊ दरम्यान दुध डेअर्या खुल्या राहणार असून भाजीपाला मार्केट, किराणा दुकाने तसेच अन्य दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णय झाला.
यांची बैठकीला उपस्थिती
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नगरसेवक पिंटू कोठारी, मुन्ना तेली, निक्की बत्रा, उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
नागरीकांनो घरातच थांबा
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घरातच थांबावे व अति अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना तोंडाला मास्क बांधावा, असे आवाहन ‘दैनिक जनशक्ती’ तर्फे नागरीकांना करण्यात आले आहे.