भुसावळचा राज्य सुरक्षा बलाने घेतला ताबा

0

जालना राज्य राखीव दलाच्या शंभर जवानांचा शहरात कडेकोट बंदोबस्त : विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

भुसावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव फैलण्यापासून रोखण्यासाठी शासनाने राज्यात संचारबंदी तसेच लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही जनता टाळ्यावर येत नसल्याने भुसावळात जालना येथून राज्य राखीव दलाच्या दहा तुकड्या बोलावण्यात आल्या. मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास एसआरपीएफच्या जवानांना फिक्स पॉईंट दिल्यानंतर त्यांनी शहराचा ताबा घेताच विनाकारण रस्त्यावर गर्दी करून फिरणार्‍यांना जवानांनी लाठीचा प्रसाद देत वठणीवर आणले तर काही ठिकाणी ऊठ-बशा काढण्याचीही शिक्षा देण्यात आली. पोलिस यंत्रणा गंभीर झाल्याचे पाहून अनेकांना पळता भुई थोडी झाली तर दुपारनंतर संपूर्ण शहरात निरव शांतता पसरली. रस्ते निर्मनुष्य होते तर व्यापारीपेठेत शोधूनही माणूस दिसत नव्हता. दरम्यान, नागरीकांनी संचारबंदीच्या काळात बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले असून केवळ सकाळच्या वेळी प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

प्रांताधिकार्‍यांनी घेतला आढावा
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी पोलिस प्रशासन, पालिका व तहसील प्रशासनाची बैठक घेत आढावा जाणून घेतला. या बैठकीला आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धीवरे, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे उपस्थित होते. याप्रसंगी प्रांतांनी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्ताचा आढावा घेतला तसेच करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. तहसील व पालिका प्रशासनाकडूनही केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. प्रांताधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून होणार्‍या सूचनांची माहिती उपस्थित अधिकार्‍यांना देत त्याचे पालन होण्याबाबत सूचना केल्या.

जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी बाहेर पडण्याचे आवाहन
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी केवळ दररोज सकाळी सहा ते दहा वाजेच्या आत बाहेर पडता येणार आहे. भाजीपाल्याचा ठोक लिलाव करण्यासाठी पहाटे पाच ते आठ तर किरकोळ भाजीपाला विक्रीसाठी सकाळी सात ते दहा तसेच किराणा दुकाने तसेच दुध डेअरी व अन्य अत्यावश्यक दुकाने सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडी राहणार आहेत. शिवाय अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल दुकाने उघडी राहणार आहे. संचारबंदीच्या काळात नागरीकांनी घरीच थांबावे, विनाकारण बाहेर पडणार्‍यांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे.

भुसावळ शहराचा एसआरपीने घेतला ताबा
संचारबंदीला भुसावळकर जुमानत नसल्याने अखेर जालना येथून शंभर जणांच्या तुकडीला मंगळवारी दुपारी पाचारण करण्यात आल्यानंतर प्रत्येकाला शहरातील विविध भागातील फिक्स पॉईंट नेमून देण्यात आले तसेच प्रत्येक नागरीकाची चौकशी करूनच शहरात सोडण्याबाबत तसेच ओळख तपासणीबाबत सूचना करण्यात आल्या. यावल रोडवरील गांधी पुतळा, बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील लोखंडी, पुल, सराफ बाजार, नाहाटा चौफुली, जाम मोहल्ला तसेच शहरातील विविध भागात बंदोबस्त लावण्यात आला. विनाकारण गर्दी करणार्‍यांची चांगलीच धुलाई दिवसभर करण्यात आल्याने अनेकांनी घरीच राहणे पसंत केले.

गर्दी ओसरल्याने औषध दुकानेही बंद
संचारबंदी असल्याने नागरीक घराबाहेर पडत नसल्याने अनेक भागात मेडिकल दुकाने दुपारनंतर बंद करण्यात आल्याचे चित्र होते. अत्यावश्यक सेवेची बाब म्हणून 24 तास औषधी दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असलेतरी ग्राहकच येत नसल्याने अनेक औषध विक्रेत्यांनी सकाळनंतर दुपारी औषधी दुकाने बंद केल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून आले.

पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरली
भुसावळ :
मुळातच संचारबंदी असल्याने नागरीकांना घराबाहेर बाहेर पडण्यास मनाई आहे मात्र असे असतानाही सोमवारी पेट्रोल पंप बंद होत असल्याच्या अफवेने अनेक नागरीकांनी पेट्रोल पंपावर गर्दी चालवली होती शिवाय पेट्रोल भरल्यानंतरही रस्त्यावर वाहने चालवण्याची परवानगी नसल्याने उपयोग तरी काय? असा प्रश्‍नही उपस्थित झाला होता. यानंतर मंगळवारी भुसावळ जालना येथून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दाखल होताच विनाकारण रस्त्यांवर गर्दी करणार्‍यांविरुद्ध धडक मोहिम सुरू करण्यात आली. संपूर्ण शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर बंदोबस्त तैनात होताच मोठी गर्दी कमी झाली तर त्याचा परीणाम पेट्रोल पंपावरील गर्दी कमी होण्यातही झाला. यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळील पंप चालकाने सांगितले की, एरव्ही दररोज सात हजार लीटर पेट्रोलची विक्री होते मात्र मंगळवारी दिवसभर शंभर लिटर पेट्रोलही विक्री झालेले नाही.