भुसावळ : शासकीय तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरूणावर प्राणघातक हल्ला व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भुसावळ न्यायालयाने नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती मुकेश नरेंद्र पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नगरसेवक मुकेश पाटील व इतरांविरुध्द 20 फेब्रुवारी रोजी शासकीय तिथीनुसार शिवजयंतीदिनी मिरवणुकीत राखुंडे नामक तरूणावर जातीवाचक शिवीगाळ व प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी नगरसेवक मुकेश पाटील यांच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर बुधवारी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे कामकाज झाले. नगरसेवक पाटील यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सरकार तर्फे अॅड.भोंबे तर आरोपीतर्फे राजेंद्र टी.रॉय यांनी काम पाहिले.