राजकीय समीकरणे बदलणार ! ; मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
भुसावळ (गणेश वाघ)- भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. कधी काळी राष्ट्रवादीत असलेल्या चौधरींनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेचे शिवबंधन बांधले होते तर दरम्यानच्या काळात पक्षापासून अलिप्त राहत त्यांनी पालिका निवडणुकीत जनआधार विकास पार्टीची धूरा स्वतःच्या कर्तृत्वावर सांभाळत पालिकेत तब्बल 19 जागा निवडून आल्या होत्या. चौधरींच्या राष्ट्रवादीत घरवापसीने राष्ट्रवादीतील निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह चौधरी समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत या प्रवेशाने अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय समीक्षकांनी व्यक्त केली.
शिवसेना ते राष्ट्रवादी चौधरींचा प्रवास
भुसावळात सर्वप्रथम 1991 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले संतोष चौधरी हे 1995 मध्ये सेनेतर्फे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणार्या चौधरींनी शिवसेनेने राजेंद्र दायमा यांना मातोश्रीवरून तिकीट जाहीर झाल्यानंतरही भुसावळात झालेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत शहरातील समाजनिहाय मते मांडून स्व.ठाकरे यांना दायमा यांची उमेदवारी बदलवण्यास भाग पाडले होते तर त्यावेळच्या डी.एस.ग्राऊंडवरच्या या सभेत दिलीप भोळे यांना तिकीट जाहीर करण्यात आल्यानंतर 1994 मध्ये त्यांना निवडून आणण्याचा करीष्मा चौधरींनी दाखवत किंगमेकरची त्यावेळी भूमिका वठवली होती.
सेनेशी फारकत घेत राष्ट्रवादीत प्रवेश
माजी आमदार भोळे यांना एका निवडणुकीत विजय मिळवून देणार्या चौधरींनी त्यावेळी आमदारकीची निवडणूक लढवण्याची मनीषा व्यक्त केली मात्र शिवसेनेने 1999 मध्ये त्यांना शिवसेनेचे तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत किल्ला लढवला मात्र मात्र त्यांना यश आले नाही. असे असलेतरी दुसर्या क्रमांकाची मते त्यांना मिळाल्याने त्यांनी हार मानली नाही. 2002 च्या निवडणुकीत त्यांनी पत्नी रेखा चौधरी यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले त्यानंतर राष्ट्रवादीतर्फे निवडून 2004-05 च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. किंगमेकरची भूमिका बजावत असतानाच भुसावळ विधानसभा मतदारसंघ 2009 आरक्षित झाल्यानंतर त्यांनी स्वीय सहाय्यक संजय सावकारे यांना पुढे करीत त्यांनाही निवडून आणले. या काळात राजकीय मतभेदामुळे सावकारे त्यांच्यापासून वेगळे झाले. मधल्या काळात चौधरी राजकारणापासून अलिप्तच राहिले. 2016 मध्ये राष्ट्रवादीला त्यांनी रामराम करीत मातोश्रीवर शिवबंधन बांधले खरे मात्र ते सेनेत रमलेच नाही व डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जनआधार विकास पार्टीच्या माध्यमातून किल्ला लढवत तब्बल 19 उमेदवार निवडून आणले.
खासदारकीचा उमेदवार द्या, निवडून आणू -संतोष चौधरी
शनिवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बलाड ईस्टेट येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चौधरींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी त्यांनी खासदारकीचा कुणीही उमेदवार द्या, दहा हजार मतांनी त्यास निवडून आणू, असा शब्द पवारांना दिला. प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, जळगाव जिल्ह्यातून अरुणभाई गुजराथी, रवींद्र भैय्या पाटील, सतीश अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे तसेच जनआधारचे नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, शेतकी संघ सदस्य, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सरपंच उपस्थित होते. दरम्यान, चौधरींच्या राष्ट्रवादीत झालेल्या घरवापसीने भुसावळ विधानसभा व रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय समीकरणे बदलतील, असे राजकीय समीक्षकांना वाटते.