भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींचा पोलिसांना गुंगारा
भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ प्रकरण : सर्वोदय छायालयाच्या जागेवरील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर उफाळला वाद : राजाश्रयाने वाढलेली अतिक्रमण निघण्याकडे आता लागले लक्ष
भुसावळ : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे. दरम्यान, शहरात राजाश्रयाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा फैलाव वाढला आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे काढण्याची हिंमतही दाखवण्याची आता गरज आहे.
अनधिकृत बांधकाम हटविण्यास विरोध
पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या तक्रारीनुसार, सोमवार, 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सतीश दिघे यांनी सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाबाबत दखल घेण्याचे आदेश दिल्यानंतर नगर रचनाकार भटू पवार, सहाय्यक नगररचनाकार शुभम आडकर, कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी रामदास मस्के, वसुली लिपीक अनिल भाकरे, चालक रमेश गुंजाळ यांच्यासह चारचाकी (एम.एच.35 ए. जी.0317) ने सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर गेल्यानंतर यावेळी माजी आमदार संतोष चौधरी आले व त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जिल्हाधिकार्यांना जागेबाबत अहवाल पाठवल्यास याद राख, अशी तंबी देत अंगावर धावून आल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.
संतोष चौधरींचा पोलिसांकडून शोध
सोमवारी रात्री उशिरा माजी आमदार संतोष चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली गतिमान केल्या. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी संतोष चौधरी यांच्या शनी मंदिर वॉर्डातील घरासह तापी नगरातील घरासह रेस्ट हाऊस परीसरात त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
साक्षीदारांचे नोंदवले जवाब
मुख्याधिकार्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जवाब नोंदवल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. घटनास्थळासह परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून पाहणी केली जात असल्याचेही उपअधीक्षकांनी सांगत चौधरी पोलिसांच्या पथकाला मिळून आले नसल्याचेही ते म्हणाले.