भुसावळचे माजी नगरसेवक जगन सोनवणेंविरोधात खंडणीचा गुन्हा
टोलनाका चालवण्याच्या मोबदल्यात मागितली खंडणी : टोल नाका कंत्राटदाराची तक्रार
जळगाव : नशिराबाद येथील टोल नाका चालवण्याच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी भुसावळचे माजी नगरसेवक तथा संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे यांच्या विरोधात नशिराबाद पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नशिराबाद टोल नाक्याचे कंत्राटदार शेहवाल समशेर खान (उदयपूरा, राजस्थान) यांनी या प्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलिसात या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर सोनवणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाईलवर धमकी देत मागितली खंडणी
तक्रारदार शेहवाल समशेर खान (45, जुना नरसिंग नाक्याजवळ, चिनवाडा, उदयपूरा, राजस्थान) यांनी नशिराबाद पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 28 सप्टेंबर रोजी 11 वाजता त्यांच्या मोबाईलवर (9425830747) वर भुसावळातील माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी त्यांच्या मोबाईल (9923268572) वरून फोन करीत टोलनाका चालवण्याच्या मोबदल्यात दरमहा पैशांची मागणी केली मात्र फिर्यादीने त्यास नकार दिल्यानंतर सोनवणे यांनी पाहून घेईल, अशी धमकी दिली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी सोनवणे यांच्या विरोधात गुरनं.155/2021, भादंवि 385, 507 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.