भुसावळच्या काळा हनुमान पंतसंस्थेला ग्राहक न्यायालयाचा दणका

0

ठेवीदारांना मिळाल्या 12 वर्षापासून ठेवींची रक्कम परत

जळगाव: ठेवीची मुदत पूर्ण होऊनही गेल्या 12 वर्षांपासून ठेवीदारांना त्यांची रक्कम परत दिली जात नसल्याने ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात 20 तक्रारी अर्ज दाखल केले. 2008 मध्ये तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. तरीदेखील ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी 2010 मध्ये निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केले. त्यावर सुनावणी ग्राहक न्यायालयाने 6 रोजी भुसावळ येथील काळा हनुमान पतसंस्थेचे चेअरमन अभय नारायण राजे यांना अडीच वर्षे तर सहा संचालकांना दोन वर्षांचा कारावास सुनावली. निकाल देताच संचालक मंडळाने ग्राहक न्यायालयाकडे 22 लाख भरले. रक्कम दिल्याने न्यायालयाचा शिक्षेचा आदेश रद्द झाला.

कारावास तसेच दंडाची सुनावली शिक्षा

या बाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील काळा हनुमान पतसंस्थेत छाया नारायण पाटील, पंकज नारायण पाटील, प्रतिभा नारायण पाटील यांच्या 2004पासून ठेवी ठेवलेल्या होत्या. या ठेवींची 2007 मध्ये मुदत पूर्ण झाली, मात्र या ठेवीदारांना सोसायटी व संचालक मंडळाने रक्कम परत केली नाही. त्यामुळे ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात 20 तक्रारी अर्ज दाखल केले. 2008 मध्ये तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. तरीदेखील ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी 2010मध्ये निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केले. त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन 6 डिसेंबर रोजी ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षा व्ही.व्ही. दाणी, सदस्या पूनम मलिक, सदस्य सुरेश जाधव या पॅनलने निर्णय दिला. त्यात पतसंस्थेचे चेअरमन अभय नारायण राजे यांना अडीच वर्षाचा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच इतर सहा संचालकांना दोन वर्षे कारावासी शिक्षा सुनावली.

निकालानंतर अर्धा तासात 22 लाख रुपयांचा भरणा

एकूण अठरा प्रकरणातील ही शिक्षा वेगवेगळी भोगायची असल्याचे आदेशात म्हटले. तसेच या वेळी तीन संचालक हजर नसल्याने त्यांच्याविरुद्ध वारंट काढण्यात आले. संचालक मंडळाने रक्कम दिल्यास हे आदेश रद्द ठरणार असल्याचेही नमूद केले. पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळास शिक्षा सुनावताच संचालक मंडळाने अर्धा तासात 22 लाख रुपयांचा भरणा केला. त्या वेळी ही रक्कम छाया नारायण पाटील या वृद्ध महिलेला देण्यात आली. रक्कम भरल्याने शिक्षेचे आदेश रद्द ठरविण्यात आले. तक्रारदारांतर्फे अ‍ॅड. हेमंत भंगाळे यांनी काम पाहिले.