चेअरमनसह माजी चेअरमन व संचालकांविरुद्ध गुन्हा
भुसावळ- शहरातील जेतवन मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेतील निधीचा चेअरमनसह तत्कालीन चेअरमन व संचालकांनी गैरवापर करीत तब्बल 35 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिसात लेखा परीक्षकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहर व तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
भुसावळ जनाआधार विकास पार्टीचे गटनेता तथा नगरसेवक उल्हास भीमराव पगारे, संस्थेचे तत्कालीन चेअरमन अनुप शिशुपाल खोब्रागडे (पंचशील नगर, बौद्ध विहाराजवळ, भुसावळ), विद्यमान चेअरमन महेंद्र शहाजी हिवराळे (द्वारकानगर, अकबर टॉकीज रोड, भुसावळ), सचिव वैशाली सुधीर जंजाळे (रेल्वे कॉलनी, चांदमारी चाळ, भुसावळ), मुकेश भागवत अढाळके (पंचशील नगर, बौद्ध विहारजवळ, भुसावळ), रवीकांत तुकाराम सोनवणे, संतोष कचरू मेश्राम, भुसावळ पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष नाना निसळकर, जगन ज्ञानेश्वर बागुल, संजय दत्तु आवटे यांच्याविरुद्ध लेखा परीक्षक प्रमोद देविदास पाटील (भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा केला वापर
शासनाने ज्या उद्देशाने सहकारी संस्थेसाठी निधी दिला त्याचा योग्य वापर न करता पदाधिकार्यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी या निधीचा गैरव्यवहार केला. 16 फेबु्रवारी 2009 ते 31 मार्च 2016 दरम्यान संस्थेचे ऑडीट (चाचणी लेखा परीक्षण) केल्यानंतर अपहार उघडकीस आला. शासनाची फसवणूक व सभासदांचा विश्वासघात केल्याने गुन्हा दाखल झाला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले करीत आहेत.