आमदार संजय सावकारे यांच्या दिड वर्षांच्या पाठपुराव्याला यश ; डीपीआरने विकासकामांना चालना; तीन महिन्यात होणार डीपीआर
भुसावळ- तालुक्यासाठी डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) आणि आरडीपी (रीव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन) तयार होण्यासाठी गेल्या दिड वर्षांपासून आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा सुरू केला होता तर मे 2018 महिन्यात आमदार संजय सावकारे यांनी पुण्याच्या अभियांत्रिकीमधील संचालक डॉ.आहुजा यांची भेट घेत चर्चा केली होती तर प्रसंगी 15 जुलैनंतर सर्वेक्षण होणार असल्याचे आश्वासन देण्यात असलेतरी नवीन वर्षातच पुणे शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शहरवासीयांना दिलासा देत 17 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. 22 जानेवारीपर्यंत संपूर्ण शहराचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यांनी शहराचा डीपीआर तयार केला जाणार असल्याचे आमदार सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. दरम्यान शहराच्या डीपीआरबाबत 1 जुलै 2018 रोजी ‘दैनिक जनशक्तीने’देखील या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते.
जिल्हा निर्मितीच्या हालचाली, महानगरपालिका होणार
भविष्याचा विचार करून आगामी काळामध्ये भुसावळ शहर जिल्हा होण्याच्या वाटचालीकडे कुच करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आताची ‘अ’ नगरपालिका भविष्यात महानगरपालिका होवून भुसावळ तालुक्याऐवजी जिल्हा होणार आहे. त्याकरीता शहरासह तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी आमदारांची धडपड आहे. त्या माध्यमातून दूरदृष्टीकोन ठेवून पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे गेल्या दोन वर्षांपासून शहरासह तालुक्याचा डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रीपोर्ट) आणि आरडीपी (रीव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्यासाठी फेबु्रवारी 2016 पासून त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता.
काय असणार ‘डीपीआर’मध्ये ?
शहरात काँक्रिटीकरण रस्ते, भूमिगत गटारी, भूमिगत केबल, कचरा संकलन, रेन वॉटर हार्व्हेस्टींग, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफीस यांच्या जागांबाबत नकाशे तयार करणे जेणेकरुन भविष्यात अडचण निर्माण होवू नये तसेच प्रभागनिहाय विकासात्मक योजना तयार करणे, तापी नदीकाठाचा बगीचासह आधुनिकपणे विकास करणे, तालुक्याच्या ग्रामीण भागांच्या गावांना गाव जोडणारे रस्ते, लहान लहान भूखंडांची तपासणी, सहकाराच्या माध्यमातून शेतीला पूरक सर्व योजना अशा परीपूर्ण ग्रामीण भागांच्या नागरीकांसाठी या डीपीआरमध्ये समावेश असेल. शिवाय हद्दवाढीच्या दृष्टीने देखील हा सर्वे लाभदायक ठरणार असून जिल्हानिर्मितीवेळी आवश्यक सरकारी प्रतिष्ठांनासाठी लागणारी जागेची यामुळे रचना करणे सोयीचे होणार आहे.
पुण्यातील 31 विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण
पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एचओडी प्रताप रावळ यांच्या नेतृत्वात 31 विद्यार्थ्यांचा चमू बुधवारी रात्री शहरात दाखल झाला तर गुरुवारी सकाळपासून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांच्या गटातील शहरातील विविध भागाता प्रत्यक्ष स्थळावर जावून सर्वेक्षणाला प्रारंभ केला. यासाठी पालिकेकडून जुना डेव्हलपमेंटची मदत घेण्यात येत आहे. 22 जूनपर्यंत विद्यार्थी शहराचे सर्वेक्षण करून प्रायमरी डेटा कलेक्ट केल्यान3ंतर प्रत्यक्षात डीआरएम तयार करण्याच्या कामास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.
केंद्रातून निधी आणण्यास मदत होणार -आमदार सावकारे
शहर व तालुक्याचा डीपीआर तयार करण्यासंदर्भात यापूर्वीच आपण संबंधिताना पत्र देवून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांची भेट घेवून त्यांना शहर व तालुक्याचा सर्वे करण्याची विनंती केली होती. आता सर्वेक्षणानंतर डीपीआर तयार होणार असून त्यामुळे केंद्रातून निधी आणण्यास मदत होणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.