अपक्ष नगरसेवक गटनेता प्रकरण ; 11 ला जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी
भुसावळ – भाजपाकडे पुरेसे नगरसेवकांचे संख्याबळ असतांनाही भाजपाच्या चिन्हावर निवडून न आलेल्या व अपक्ष नगरसेवक असलेल्या हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांना पालिकेतील सत्ताधार्यांनी गटनेता बनवल्याने सर्वांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या जनआधार विकास पार्टीने जिल्हाधिकार्यांकडे दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह भाजपाच्या 29 नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू नये? या आशयाची नोटीस बजावली आहे. 11 रोजी याप्रकरणी व्यक्तिशः वा वकीलासह व आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले आहे. या सुनावणीस संबंधित उपस्थित न राहिल्यास संबंधितांचे कुठलेही म्हणणे नाही, असे गृहित धरून अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे. अपात्रतेच्या नोटीसीने भाजपाच्या गोटात मात्र प्रचंड खळबळ व अस्वस्थता पसरली आहे.
या नगरसेवकांना बजावली नोटीस
भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजपाचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक लक्ष्मी रमेश मकासरे, अमोल मनोहर इंगळे, सविता रमेश मकासरे, रवींद्र बाबूराव खरात, दीपाली परीक्षीत बर्हाटे, राजेंद्र त्र्यंबक नाटकर, प्रीतमा गिरीश महाजन, प्रमोद पुरूषोत्तम नेमाडे, अनिता एकनाथ सोनवणे, मेघा देवेंद्र वाणी, प्रा. दिनेश राठी, मंगला संजय आवटे, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, निर्मल रमेश कोठारी, शोभा अरूण नेमाडे, महेंद्रसिंग हनुमानसिंग ठाकुर, रमेश गुरूनामल नागराणी, पुष्पाबाई रमेशलाल बत्रा, सुषमा किशोर पाटील, किरण भागवत कोलते, सोनल रमाकांत महाजन, प्रतिभा वसंत पाटील, सोनी संतोष बारसे, अॅड.बोधराज धोंडू चौधरी, शेख सईदा शफी, मुकेश नरेंद्र पाटील व गटनेता मुन्ना इब्राहिम तेली या पदाधिकार्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आल्याने भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तक्रारदार जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे व दुर्गेश नारायण ठाकुर यांनाही नोटीसीची प्रत देऊन 11 रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्यांच्या कारवाईकडे लक्ष
अपक्ष नगरसेवकाला गटनेता बनवण्यात आल्याने या प्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे. सोमवार, 4 डिसेंबर रोजी भुसावळात या नोटीसी धडकल्यानंतर भाजपा नगरसेवकांना चांगलीच धडकी भरल्याची चर्चा आहे.