भुसावळ- यंदा हतनूर धरणातील जिवंत साठादेखील संपल्याने भुसावळकरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्यानंतर पोलिस वसाहतीती कर्मचार्यांनादेखील टंचाईचे चटके सोसावे लागू नये यासाठी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या पुढाकाराने गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला हातपंप सुरू करण्यात आल्याने कर्मचार्यांसह कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बंद हातपंप सुरू झाल्याने समाधान
पोलिस वसाहतीत अनेक वर्षांपासून हातपंप असलातरी तो बंदावस्थेत होता. या ठिकाणी राहणार्या पोलिस कर्मचार्यांच्या परीवाराला पाण्यासाठी भटकंतीची वेळ आल्याने व पुढेही येणारी परीस्थिती ही दुष्काळी असल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांनी पुढाकार घेऊन बंद पडलेल्या हात पंपाला सुरू केले तसेच पंपावर इलेक्ट्रीक मोटारही बसवण्यात आल्याने पोलिस वसाहतीचा पाण्याचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे. या कामासाठी एएसआय तस्लिम पठाण, एएसआय युवराज नागरुत, राजु परदेशी, कादर तडवी, छोटू वैद्य आदींनी सहकार्य केले.