‘धनाजीसह तानाजी’ ने दाखवले कसब ; तीन मिनिटात जिंकला अंतिम सामना
भुसावळ- ड्रॅगनला नमवत जगज्जेता ठरलेला भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लँका बोटस्च्या संघाने रशियातही आपला डंका वाजवत विजयावर शिक्कामोर्तब करीत नवीन विक्रम प्रस्थापित केला. पनीशर या ओमस्काय रशियन चॅम्पियन टीमशी अंतिम लढत अत्यंत चुरशीची व तेव्हढीच आव्हानात्मक असताना भुसावळच्या संघाने अवघ्या तीन मिनिटात खडतर आव्हान पूर्ण करीत एकही पॉईंट विरोधी संघाला मिळवू न देता स्पर्धेत आपले वर्चस्व मिळवले. सालिकोवा करीना वर्ल्ड स्किल रशियाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते दिड लाख रुबेल्स (साधारण एक लाख रुपये) आणि मानचिन्ह ब्लँका बॉट्स संघाला देवून गौरवण्यात आले.
भुसावळच्या संघाचा रशियातही डंका
‘द युनियन ऑफ यंग प्रोफेशनल्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत भरवल्या जाणार्या ‘हायटेक 2018’ ही स्पर्धा रशियामधील एकाटीनबर्ग येथे 24 ते 28 ऑक्टोबरदरम्यान झाली. 110 किलो वजन गटाच्या कॉम्बॅट रोबोटिक्स स्पर्धेत भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ब्लँका बोट्स सहभागी झाला होता. या स्पर्धेसाठी संघाने ‘धनाजी गामा 2.0’ आणि तानाजी’ या दोन रोबोटने सहभाग घेतला होता.एकूण 69 देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रामुख्याने कझागीस्थान, रशिया आणि युरोपातील संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
अवघ्या तीन मिनिटात मिळवला विजय
संघाने पहिल्या फेरीत कझाकीस्थानचा प्रेडीएटोरचा पराभव करत धनजीने तीन मिनिटात पुढची फेरी गाठली. दुसर्या सामन्यात रशियाच्या सेंट पीटर बर्गच्या वेबरला 50 सेकंदात हरवले तसेच उपांत्य सामन्यात पिंकी पाई रशियातील टीम युनिकॉर्नचा 1 मिनिट 17 सेकंदात पराभव करत अंतिम फेरी गाठून येथेही तीन मिनिटात या संघाने विजय मिळवला.
हायटेक स्पर्धा जिंकण्याचे समाधान
चीन, अमेरीका, न्यूझीलँडसारख्या संघाला नमवून जगज्जेता ठरलो होतो त्यामुळे रशियाच्या स्पर्धेचे आवाहन कठीण होते पण अशक्य नव्हते, असे संघ नायक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम विभागाचा विद्यार्थी अक्षय जोशी म्हणाला. आयआयटी गुवाहाटी, आयआयटी मुंबईचे रोबोवार व याच बरोबरीने चीन येथील अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जगज्जेतेपद जिंकल्याने एक वेगळ्याच अपेक्षांच्या ओझ्यानिशी रशियातील स्पर्धेत सहभागी झालो होतो. जागतिक रोबोटिक समुदायाच्या अपेक्षा, नवीन रोबोट्सकडून असणार्या तांत्रिक अपेक्षा ह्या सर्वांवर खरे उतरत रशियातील हायटेक-2018 स्पर्धा जिंकण्याचे समाधान मोठे आहे, असेही अक्षय जोशी म्हणाला.
सांघिक प्रयत्नांचे यश -प्राचार्य सिंह
वर्षानुवर्षांपासून विद्यार्थ्यांनी केलेली संघबांधणी, हिंदी सेवा मंडळाच्या पदाधिकार्यांकडून सातत्याने मिळणारा पाठिंबा व प्रोत्साहन, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.एन.एम.खंडारे, प्रा.जी.सी.जाधव, प्रा.जे.एस.चौधरी व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आणि कार्यशाळा सहाय्यकांच्या सहकार्यातून हा विजय साकारण्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाकडून गौरव
अक्षय जोशी, प्रफुल्ल चौधरी, राहुल न्हावकर, रोहित वारके, गिरीश नंदनवार व ऋषिकेश बडगुजर यांनी पुन्हा एकदा भारताचे नावलौकिक करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भुसावळचा दबदबा कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याचा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा अभुतपुर्व समन्वय असून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, असे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोषध्यक्ष एम. डी. तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागरणी यांनी कळवले आहे. प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह, डॉ.आर.बी.बारजीभे, विभागप्रमुख डॉ. पंकज भंगाळे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा. सुधीर ओझा, प्रा. अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.