अहमदाबादच्या स्टार्च फॅक्टरी चेअरमन व संचालकाविरूध्द गुन्हा
भुसावळ : भुसावळातील दोघा व्यापार्यांकडील मक्याची खरेदी केल्यानंतर तब्बल 70 लाख रुपये न दिल्याने व धनादेश न वटल्याने अहमदाबादस्थित अनिल स्टार्च प्रा.लि.कंपनीच्या चेअरमनसह दोघा संचालकांविरूध्द भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या व्यापार्याची प्रथमच अशा पध्दतीने फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भुसावळच्या व्यापारी वर्गात मोठीच खळबळ उडाली आहे.
धनादेश न वटल्याने फसवणूक उघड
भुसावळातील मक्याचे व्यापारी अमित अग्रवाल यांच्याकडील 32 लाख 83 हजार 393 रुपये किंमतीचा मका आरोपींनी खरेदी केला. सुरक्षेपोटी दिलेला धनादेश बँकेत वटवू नका, आरटीजीएसने पैसे अदा करू, असे सांगून फसवणूक करण्यात आली तर दुसरे मका व्यापारी नरेंद्र (गुड्डू) अग्रवाल यांच्याकडीलही 36 लाख 61 हजार 408 रुपये किंमतीचा मका खरेदी करूनही आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने दोघा व्यापार्यांनी रविवारी रात्री बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अहमदाबाद स्टार्च फॅक्टरीचे चेअरमन अमोल श्रीपालशेठ, संचालक श्वेतांग शैलेशभाई व शशीन मेहता यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.