भुसावळच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना ऑनलाईन गंडविले

0

सायबर पोलिसांकडून संशयित भावंडांना अटक ; फसवणुकीची रक्कम मिळाली परत

जळगाव : भुसावळ येथील सदानंद पुंडलिक बर्‍हाटे आणि तुकाराम दामू अटाळे या दोघा निवृत्त कर्मचार्‍यांना ऑनलाईन गंडा घालणार्‍या शैलेशकुमार अनुठा पांडे, मनिकांत अनुठा पांडे (रा. मोतीहारी, पूर्व चंपारण्य बिहार) अशा दोघा भावंडांना बिहार येथून सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत त्यांनी गुन्हा कबूल केला असून पंचासमक्ष फसवणुकीची रक्कम परत दिली आहे.

भुसावळ येथील तुकारामनगरातील रहिवासी सदानंद पुंडलिक बर्‍हाटे (वय 72) या निवृत्त कर्मचार्‍याच्या मोबाईलवर फोन करुन बँकेचा मॅनेजर बोलत असून कार्ड बंद असल्याची बतावणी करत एटीएमकार्डवरील 16 अंकी क्रमांक मिळविला व त्यांच्या पेन्शन खात्यातून 46 हजार 997 रुपये ऑनलाईन वळवून घेतले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग झाला होता. दुसर्‍या एका प्रकरणात भुसावळ येथील रहिवासी तुकाराम दामू अटाळे (वय-61) यांच्या बँक खात्यातून अशाच प्रकारे 16 जूनला 69 हजार 696 रुपयांचा गंडा घातला होता.

दोघेही संशयित कारागृहात
पोलीस निरिक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शैलेशकुमार अनुठा पांडे, मनिकांत अनुठा पांडे (रा. मोतीहारी, पूर्व चंपारण्य बिहार) अशा दोघा भावंडांना बिहार येथून अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, मल्टीसिम डिव्हाईस जप्त करण्यात केले होते. संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. पोलिस कोठडीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, फसवणुकीची रक्कम संशयितांनी पंचासमक्ष परत दिली आहे. सद्या दोघेही संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.