जळगाव एसीबीचा तिहेरी सापळा यशस्वी ; 40 हजारांची लाच भोवली
भुसावळ (गणेश वाघ)- हिंदी सेवा मंडळाच्या संस्थेत प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्या जात पडताळणीचा दाखला विनाविलंब मिळवून देण्यासाठी 40 हजारांची लाचेची मागणी करणार्या हिंदी सेवा मंडळाचा लिपिक घनश्याम टेमान यासह या प्रक्रियेसाठी सहकार्य करणार्या जळगावच्या रायसोनी संस्थेतील लिपिक तथा खाजगी पंटर किरंगे व जात पडताळणी विभागातून दाखला आणून देण्यासाठी मदत करणार्या वरीष्ठ लिपिक ललित ठाकरे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा रंगेहाथ लाच घेताना पकडले. अत्यंत गोपनीयरीत्या पथकाने तिघाही आरोपींच्या बुधवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री 12 वाजेदरम्यान टप्प्याटप्प्याने मुसक्या आवळल्या. एसीबीचा ट्रॅप झाल्याची वार्ता भुसावळात कानोकान पसरल्यानंतर सुरुवातीला पोलिस विभाग नंतर शिक्षण व भूमीलेख विभागातील कर्मचारी अडकल्याची चर्चा रंगल्यानंतर रात्री 12 वाजेनंतर मूळ आरोपींचा चेहरा स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास घेतला. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्यांनी अत्यंत शिताफीने व गोपनीयता बाळगत हा सापळा यशस्वी केल्याने पथकाचे कौतुक होत आहे. दरम्यान, रात्री उशिरा आरोपींच्या घर झडतीसह बाजारपेठ पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.